वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवा

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे तसेच मेडिकल कौन्सिलकडे लवकरात लवकर पाठविण्यात यावा, या मागणीसाठी मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांच्या नेतृत्वात सुमारे दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले. मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे ४०० खाटा असलेल्या रुग्णालयाच्या दहा किलोमीटर अंतराच्या आत असावे तसेच सलग २० एकर जागा उपलब्ध असावी, असा नियम असल्याचे नमूद करून यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सुयोग्य वाटणाऱ्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट व परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा व भावनिक विषय असून लवकरात लवकर महाविद्यालयाची उभारणी गरजेची असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

महाविद्यालय हे हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ लगतच्या ग्रामीण जनतेची सुद्धा गरज भागविणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी आदी विविध क्षेत्रातील जवळपास २००० जणांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माजी प्राचार्य राजेंद्र सातपुते, मंगेश चवडे, नवल मानधनिया, रुपेश लाजूरकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आ. कुणावार.जनता नर्सिंग स्कूल येथे मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी समितीच्या वतीने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सहकार्य करावे, तसेच ४०० कोटींचा निधी शासनाकडून तातडीने मंजूर करून घ्यावा. अशी विनंती करण्यात आली होती. यावर आ. कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालय करिता शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांना सांगितले.