भोजाजींच्या दर्शनाने लाखो भाविक झाले तृप्त

आजनसरा/प्रतिनिधी संतनगरी आजनसरा येथे सोमवार १७ रोजी संतश्रेष्ठ जगतगुरू भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे ब्रह्ममुहूर्तावर विधीवत पूजन करून पुण्यतिथी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली. पहाटेपासुनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती. भोजाजी महाराजांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य नवस म्हणून करण्याची परंपरा आहे. येथे बुधवारी आणि रविवार हजारो भाविक पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. पुण्यतिथीच्या दिवशी हजारो भाविकांनी संत भोजाजी महाराजांचे दर्शन घेत तृप्त होत पुरणपोळीचा प्रसाद घेत ढेकर दिली.

काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर दुपारी १ वाजतापासुन महाप्रसादाला सुरूवात झाली. संतश्रेष्ठ भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा हभप देवाजी महाराज यांनी १९५५ पासुन सुरू केली असुन आजही अखंड सुरू आहे. पुण्यतिथी महोत्सव, महाप्रसाद व दिंडी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीसह इतर जिल्ह्यातून एक लाखावर भाविकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपुर्ण आजनसरा संतनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली होती. गावकारी आपसातील मतभेद विसरून पुण्यतिथी महोत्सवात बालकांपासुन ते वयोवृद्ध व्यक्ती वाट्याला येईल ती सेवा करताना दिसत होते. गावात घरोघरी पाहुणे, प्रवचनकार, कीर्तनकार व वारकरी संप्रदायातील लोकांचा निवास असतो. हा सोहळा आजनसरा वासीयांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव असतो.

त्यामुळे भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा नावलौकिक संपूर्ण विदर्भात पसरला आहे. दिंडी सोहळ्याच्या मार्गात सडा, रांगोळी काढून गावकरी येणार्या भाविकांचे स्वागत करीत होते. सोमवारी रात्री ९ वाजता महाराजांची पालखी समाधी स्थळापासुन नगर परिक्रमा करण्यासाठी भजनी दिंड्या, भगव्या पताका व भोजाजी नामच्या जयघोषात वारकरी संप्रदायाची पताका फडकवित २५ घोड्यांचा ताफा व बँड पथकाच्या उपस्थितीत पालखीचे रिंर्गण व दिंडी स्पर्धा घेऊन सकाळी ८ वाजता श्रींच्या समाधीस्थळी पोहचाल्यानंतर दहीहांडी फोडण्यात आली. पुण्यतिथी सोहळ्याला शंकराचार्य व सयाजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. यादरम्यान अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांच्या मार्गदर्शनात संत भोजाजी महाराज देवस्थान द्वारा संचालित सेवार्थ दवाखान्यात विभागप्रमुख डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक येनोरकर, डॉ. मनीषा भाईमारे, अधिपरिचारीका सपना खोडे, रुग्णसेवक रोशन धनाडे, सुरक्षा रक्षक हिरामण पाटील यांनी २४ तास आरोग्य सेवा दिली, हे विशेष.