मनरेगाअंतर्गत राज्याला सन २०२२-२३ करिता रु. २३४६ कोटींचा निधी

वर्धा/नवी दिल्ली/प्रतिनिधी मनरेगा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षात २३४६ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे का, गेल्या तीन वर्षांत आणि चालू वर्षात प्रत्येकी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर केलेल्या, वाटप केलेल्या आणि वापरल्या गेलेल्या निधीचा तपशील, राज्य आणि जिल्हावार विशेषतः महाराष्ट्राच्या वर्धा वर्धा लोकसभा मतदारसंघातील योजनेसंदर्भात वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी तारांकित प्रश्न संख्या ४४३३ अंतर्गत उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले. खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे उत्तर प्राप्त झाले असुन त्यानुसार या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक अकुशल कामगाराला वर्षातून १०० दिवस काम देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रातील १०० दिवस काम करणा-या परीवारांची संख्या १३००३७ आहे, यामध्ये वर्धा जिल्हयातील १५८९ परीवार व अमरावती जिल्हयातील २४८६९ परीवारांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जात आहे. २०१९-२० मध्ये मनरेगासाठी महाराष्ट्राला १७२३ कोटी, २०२०२१ या आर्थिक वर्षात १६३८ कोटी, २०२१-२२ या वर्षात २०९३ कोटी मिळाले. या वर्षी यात पुन्हा वाढ करून २०२२-२३ मध्ये २३४६ कोटी रुपयांचा दिल्याचे यावेळी साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, तसेच महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पुर्ण झालेले कामे २४३४७९ खर्च झालेला निधी रु. २१६३८१.१, सन २०१८-१९ पुर्ण झालेली कामे ३२४३५३ खर्च झालेला निधी रु. २२६७१३.७, सन २०१९-२० मध्ये पुर्ण झालेली कामे ३३५३६० खर्च झालेला निधी रु.१७०४४४.४, सन २०२०-२१ मध्ये पुर्ण झालेली कामे २६२१६४ खर्च झालेला निधी रु.१८८६२९.९, सन २०२१-२२ मध्ये पुर्ण झालेली कामे २३१८२० खर्च झालेला निधी रु.२२५५१७.६ झाला असल्याचे उत्तरातुन स्पष्ट केले.