नवरात्रीनिमित्त राज्यात “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी करोना विषाणूच्या संसर्गानंतर यंदा महाराष्ट्रात दहीहंडी आणि गणेशोत्सव दिमाखात साजरा केला आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी विविध योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता नवरात्री उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत महाराष्ट्रातील जनतेला नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाचीही माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदेनी संबंधित व्हिडीओत म्हटलं की, आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या वर्षी गणेशोत्साप्रमाणे नवरात्री उत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करत आहोत. त्यासोबतच सार्वजनिक आरोग्यविभागातर्फे “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हे अभियान राबवलं जाणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व मातांच्या आरोग्यासाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. सुदृढ समाजासाठी महिलांचं आरोग्य हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी माता कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी. ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी. यासाठी सरकारकडून “माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ हा उपक्रम राबवला जात आहे, या महोत्सवानिमित्त सर्व माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.