वर्धेकरांचा जीव धोक्यात, २२४ इमारती धोकादायक

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक नगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागाने विशेष मोहीम राबवून धोकादायक असणार्या २२४ इमारतींचा शोध घेत त्या इमारत मालकांना नोटीस बजावली. नोटीस बजावण्यात आलेल्या मालकांपैकी १० इमारत मालकांनी मालमत्तेचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे वर्धा नगरपालिका प्रशासनाला कळविले आहे. पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा नगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागाने नागरिकांसाठी धोक्याच्या ठरणार्या शहरातील जीर्ण आणि नाल्या काठावरील इमारतींचा विशेष मोहीम राबवून शोध घेतला. याच मोहिमेदरम्यान १८० जीर्ण आणि नाल्याकाठावरील ४४ इमारती धोक्याचे असल्याचे पुढे आले.

या २२४ इमारत मालकांना पालिकेने नोटीस बजावत तातडीने जीर्ण इमारती पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीर्ण इमारत मालकांनी पालिकेच्या नोटीसला पाठ दाखविल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कुठल्याही घर व इमारतीचे आयुष्य किमान ४० वर्षे धरले जाते. ४० वर्षांहून अधिक जुन्या इमारती नागरिकांच्या राहण्यासाठी योग्य आहे काय याची शहानिशा करण्यासाठी अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नागरिकांनी करून घेणे फायद्याचे ठरते.