जिल्हा परिषद शाळेतील २९ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीकरिता पात्र

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृती परिक्षेत घवघवीत यश मिळवावे यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेण्यात आले होते. सोबतच विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहू नये यासाठी सेस फंडातून विद्यार्थ्यांच्या शिष्यृत्तीची फी भरण्यात आली होती. या प्रयत्नांमुळे २९ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेस स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी बसू शकतात. विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ५० हजार पेक्षा अधिक नसावे.                                                परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी असे चार वर्ष दरमहा एक हजार रुपये ४८ रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक पातळी पर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हा या शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसावे याकरिता शाळास्तरावर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्ग घेण्यात आले. यासाठी शिक्षकांनी देखील परिश्रम घेतले. कुठलाही विद्यार्थी पैशाअभावी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून विद्यार्थ्यांची फी भरण्यात आली. गेल्या शैक्षणिक वर्षांत जिल्ह्यातील ४५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

त्यातील २९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यात कारंजा तालुक्यातील २३, वर्धा तालुक्यातील ५ व समुद्रपूर तालुक्यातील एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती घालवण्याचे प्रयत्न केल्यामुळे आज निकालामध्ये ९३ टक्क्यांनी प्रगती दिसून येत आहे. मागील ६ महिन्यांमध्ये मिशन दीपस्तंभच्या माध्यमातून सुद्धा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादनूकीत उल्लेखनीय प्रगती दिसते. जिल्हा परिषदेचे शिक्षक कार्यक्षम असून त्यांच्या प्रयत्नाची ही फलनिष्पत्ती आहे, असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय मेहेर त्यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्याप्रती असलेली आस्था व सर्वच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता यावा व त्यांच्या ध्यानात अधिक भर पडावी यासाठी त्यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम सर्व शाळा स्तरावर राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्र

सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एनएमएमएस परीक्षेचे गुणपत्रक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे गतवर्षाचे (इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी) गुणपत्रक, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचे रुपये ३ लाख ५० हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला, ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला त्या प्रवर्गाचा जातीचा दाखला, आधारकार्ड प्रत, बँक पासबुकची प्रत.