दिवाळीनंतर दिवाळं! शेतमाल बाजारात येताच भाव घसरले, जागतिक बाजारपेठेचा परिणाम

वर्धा/प्रतिनिधी यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु जागतिक बाजारपेठेत सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये घसरण झाल्याने आपल्याकडेही शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भावामध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर असून पुढेही फारसे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्यावर्षी जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला १४ डॉलर प्रति बुसेल भाव होते. गेल्यावर्षी सुरुवातीला आपल्या देशातून ढेपेची निर्यात करण्यात आली. आणि त्यानंतर सोयाबीनचे पीक बुडाले अशा बातम्या पसरल्याने ढेपीची किंमत आपसूकच वाढली. दरम्यान सोयाबीनचा आयात कर शून्य केला आणि जीएम ढेप आयात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आपल्याकडे सोयाबीनचे भाव वाढले.