गजाननमय झाले शेगाव, विदर्भ पंढरीत लाखो भाविक दाखल

प्रतिनिधी आज श्री गजानन महाराजांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आहे. कोरोनानंतर निर्बंधमुक्त हा पहिला सोहळा असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत शेगावमध्ये लाखो भाविक जमल्याचे चित्र होते. दर्शनबारी व मुखदर्शनासाठी हजारो भाविकांच्या दिर्घ रांगा लागल्या. दर्शनासाठी किमान पाच तास लागत असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथून देखील पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या ११०० भजनी दिंड्या गजानन महारांजाच्या किर्तीची प्रचिती देत आहेत.. श्री गजानन महाराज की जय आणि गण गण गणांत बोते च्या जयघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमुन निघाले आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला साजरा केला जातो. संपूर्ण शेगाव पूजा- आरती, पालखी सोहळा, अभिषेक, याने भक्तिमय झाला आहे. तर पारायण करुन भाविक महाराजांचा आशिर्वाद घेत आहे.