शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी पारंपरिक पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळले पाहिजे. गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंबा फळबागेची लागवड केल्यास बाजारपेठ, तांत्रिक सहाय्य, निर्यात आदी सहज उपलब्ध हाइल. जिल्ह्यातील हवामान आंबा पिकाच्या फळबागेसाठी अनुकूल असून योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक दिवसीय आंबा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते, या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कृषि विभागीय सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर, गट शेती प्रवर्तक तथा आंबा फळपिक तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, महा केसर आंबा बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव उगले, कृषी विद्यापिठाचे विभाग प्रमुख डॉ. डी.एम. पंचभाई यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले पुढे म्हणाले, कोणत्याही पिकांची निवड करतांना जमिनीची पोत तपासणे आवश्यक असून पाणी, खनिजद्रव्ये आदींची तपासणी करुन योग्य पिकांची निवड करावी. जिल्ह्यात काही शतकऱ्यानी एकदा फळबाग लागवड सुरूवात केल्यास इतरही लोक लागवडीसाठी पुढे येतील. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास जिद्द, चिकाटी, सातत्य व योग्य नियोजन असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. गट शेती प्रवर्तक तथा आंबा फळपिक तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, आजही आंब्याची फळबाग लागवड ही पारंपरिक पध्दतीने केली जाते. आंबा फळबाग शेतीकडे शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. देशात आंब्याची लावगड जरी जास्त होत असली तरी येणारे हेक्टरी उत्पादन फारच कमी आहे. आंबा फळबाग लागवड करतांना योग्य कलमांची निवड, अतिघन लागवड पध्दती, कलमाची छाटणी, रोग व कीड व्यवस्थापन तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आंब्याचे हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले. जिल्ह्यात आंबा या पिकाची फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून उत्पादित आंब्याला बाजारपेठ, फळ पिकांचे निर्यातक्षम उत्पादन, विक्री व्यवस्थापन करणे व यामाध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देणे, याउद्देशाने एक दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित इतरही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक दिवसीय आंबा महोत्सवामध्ये केशर, दशहरी, लंगडा, वनराज आदी प्रजातींच्या आंब्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या महोत्सवात कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.