पंढरी दुमदुमली! कार्तिकी यात्रेसाठी सात लाख भाविक दाखल; फडणवीसांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूज

पंढरपूर (सोलापूर)/प्रतिनिधी कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज्ा झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे. सोबतच, मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे.

त्यामुळे, ७३ कोटीच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा होणार आहे. तर, उपमुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या २७०० कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहावे लागणार आहे. तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करणार आहे. यासोबतच, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची भेट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.