रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये रोष

वर्धा/प्रतिनिधी भूमिगत ड्रेनेज योजनेचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याकरिता भरदिवसा रस्ता खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोशालिस्ट चौक परिसरात हे काम सुरू असल्याने वाहनचालकांसह व्यापारी वर्गात रोष निर्माण झाला आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी मुख्य मार्ग फोडून भूमिगत ड्रेनेज योजनेची पाइपलाइन टाकण्यात आली. त्याचवेळी अंतर्गत रस्त्यांवर पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर टाकलेल्या पाइपलाइन एकमेकास जोडण्याचे काम करण्यात आले नाही. ते काम तसेच शिल्लक ठेवण्यात आले होते.

आता तब्बल दीड ते दोन वर्षानंतर पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाकरिता शहराचा मुख्य मार्ग मुख्य चौकात फोडण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे मार्गाच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली आहे. सोशालिस्ट चौक हा शहराचा मुख्य चौक आहे. बाजारपेठेत जाण्याकरिता येथूनच ग्राहकांचे आवागमन असते. बाजारपेठेत लग्न समारंभामुळे ग्राहकांची गर्दी वाढली. अशातच सुरू असलेल्या खोदकामामुळे येणारा आवाज, वाहनांना होणारी अडचण व ग्राहकांना होणारा त्रास अनेकांच्या रोषाचे कारण ठरला आहे. रस्त्याचे खोदकाम हे दिवसाऐवजी रात्री १० वाजतानंतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.