जिपच्या बांधकाम विभागाला निविदा रद्द करण्याची नामुष्की

वर्धा/प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच वर्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने फर्निचर खरेदीसाठी निविदा मागविल्या. शहरातील एकाच एजन्सीला हे काम दिल्याने घोटाळा झाल्याचा आरोप करीत गोंदियातील एका कंत्राटदारासह सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार नोंदविली. यानंतर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. पण, अंतोरा आणि हिंगणीसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. जिप बांधकाम विभागांतर्गत वायगाव (नि.), हिंगणी, अंतोरा, तळेगाव (टा.), पोहणा, कोरा, नारा या सात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फर्निचर उभारण्यासाठी प्रत्येकी ५० लाखांच्या निविदा मागविण्यात आल्या.

बांधकाम विभागामार्फत ही प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबविण्यात आली. जेम पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वर्ध्यातील एका कंपनीला हे काम दिले गेले. याशिवाय सिमेंट बेंच उभारणीसाठीदेखील दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या. पण, इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच फर्निचरसाठी प्रक्रिया केली जात असल्याने हे नियमबाह्य असल्याचा आरोप काही कंत्राटदारांनी केला. यानंतर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. हिंगणी आणि अंतोरा येथील निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सर्वच निविदांमध्ये एकच एजन्सी पात्र ठरत असल्याचेही दिसून आले आहे. यावरून गोंदिया येथील एका कंत्राटदाराने आक्षेप नोंदविल्याने वाद निर्माण झाला आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेंदे यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, १३ फेब्रुवारीच्या शासकीय अध्यादेशाने कुठलेही साहित्य टेंडरने १५ फेब्रुवारीनंतर घेता येणार नाही. याची मर्यादा ३१ मार्चपर्यंत होती. आम्ही सात कामं अपलोड केली होती. दोन कामांना प्राथमिक मान्यता देण्यात आलेली आहे. काम करणार्याला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. प्राथमिक मान्यता उशिरा मिळाल्याने टेंडर रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.