काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात अल्पसंख्याकांनीही थोपटले दंड

वर्धा/प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यपद्धती न बदलल्यास काँग्रेसला नुकसान होईल. कायम काँग्रेेसी असा शिक्का असलेल्या अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजाविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रस्थाळी भूमिका घेतली आहे. आम्ही यापूर्वीही काँग्रेस श्रेष्ठींकडे नाना पटोले यांच्या विरोधात निवेदन दिले आहे. परंतु, त्यावर अद्याप योग्य तो निर्णय झालेला नाही. त्यामुळे अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज नाराज आहेत. पटोले यांना पक्षाने समज न दिल्यास त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील, अशी भूमिका पक्षाध्यक्ष मल्लिकाजर्ुन खर्गे यांना दिलेल्या निवेदनातून मांडण्यात आली आहे. खडगे यांना दिलेल्या निवेदनात नमुद केल्याप्रमाणे, पटोले यांची प्रत्येक कृती निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारी ठरत आहे. अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन तसेच आदिवासी, दलित समाज नाराज झाला आहे. राज्यातील ४८ पैकी केवळ एकच जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक समाजाचा असून विदर्भात तर एकही जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख पदावर नाही.
राजस्थानच्या चिंतन शिबिरात नव्या पण निष्ठावंत चेहर्याना संधी देण्याचे ठरले होते. मात्र, राज्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात सहभागी के. के. पांडे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा पटोले यांनी केली होती. पण, अद्याप ती मदत देण्यात आली नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पटोले यांनी नाराज केले. प्रदेश कार्यकारिणीत बदल न झाल्यास आगामी निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही या नेत्यांनी दिला आहे. निवेदनावर प्रकाश मुगदिया, राजेंद्र शर्मा, बंडू मल्लेलवार, ॲड. माजिद कुरेशी, हर्षवर्धन निकोसे, महेंद्रसिंग सलूजा, आर. एम. खान नायडू, इक्राम हुसेन, रवी शिंदे, मनोज बागडे, विजय बाहेकर, प्रल्हाद ठाकरे व अन्य आजी माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.