एकनाथ शिंदे यांना “ढाल तलवार’

मुंबई/प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला काल “बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर आज ढाल तलवार चिन्ह बहाल केलं आहे. शिंदे गटाने काल दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारले होते. त्यानंतर पुन्हा चिन्हांचे पर्याय देण्यासंबंधीचे निर्देश आयोगानो शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या सूचनेनंतर शिंदे गटाने आज दुपारपर्यंत पर्याय पाठवले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंकडे चिन्हासाठी आज सकाळी दहा वाजेपर्यंत तीन पर्याय मागितले होते. शिंदेंच्या पर्यायातून एक पर्याय निवडून निवडणूक आयोगाने सायंकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं. एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. तर, ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होतं. मात्र ते पक्ष २००४ ला यादीतून वगळ्यात आल्यानं शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं.