सेवा पंधरवाडा शिबिरात नागरिकांना मिळाले हक्काचे मालमत्ता पत्रक

वर्धा/प्रतिनिधी जुन्या गावठाणातील नागरिकांकडे अद्ययावत मालमत्ता पत्रक आणि गावठाण नकाशे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जमीनीचा कागदोपत्री मालकी हक्क नसल्याने कर्ज न मिळणे, घर बांधकामास परवानगी अशा अनेक समस्यांना समोर जावे लागते. सेवा पंधरवाडाच्या निमित्ताने मात्र अनेकांना हक्काचे मालमत्ता पत्रक उपलब्ध झाले आहे. लगतच्या साटोडा येथील अनेक नागरिकांना एकाच वेळी आज आ.डॅा.पंकज भोयर यांच्या हस्ते या पत्रकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदारांसह उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रसन्ना भुजाडे, साटोडा येथील सरपंच अजय जानवे, ग्रामपंचायत सदस्य गौरव गावंडे, प्रविण नागोसे, संदीप मारवाडी, पृेशीराज शिंदे, पंकज अतकर, ग्रामविकास अधिकारी के.जे.चव्हाण उपस्थित होते. जुन्या गावठाणांमध्ये अद्यापही रहिवाश्यांकडे स्वत:च्या मालकीचे कागदपत्र नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. शासनाने यासाठी स्वामित्व योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वे केले जात आहे. सेवा पंधरवाडा अंतर्गत गावठाणांचे सर्वेक्षण करून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे पत्रक वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वर्धा तालुक्यात ६९ ड्रोन सर्वे पुर्ण झाले आहे. त्यापैकी ४७ गावांची चौकशी देखील पुर्ण झाली गावांच्या सनद व आखीव पत्रिका तयार करुन सनद वितरण केले जात आहे. सेवा पंधरवाडा कालावधीत तालक्यातील अधिकाधीक नागरिकांना सनद वाटपाचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी विकास भवन येथे आयोजित शिबिरात भूमी अभिलेख कार्यालयाने देखील सहभाग नोंदविला आहे. या शिबिरात आज साटोडा येथील अनेकांना सनद वाटप करण्यात आली. उद्या देखील काही नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. सनदमुळे बँकांचे कर्ज, मालमत्ता तारण, विविध आवास योजनांचा लाभ घेता येईल. जमीनीच्या मालकी व हद्दीबाबत असलेले वाद संपुष्टात येईल. सनद वाटप केलेल्या शेतकऱ्यांमध्ये शरद बडे, ताराचंद नराते, श्रीधर कडू, आकाश भगत, ज्ञानेेशर कडू, लौकिक मानिककूडे, शेषराव भगत यांचा समावेश आहे. जमीनीचे मालमत्ता पत्रक नसल्याने ज्या ज्या ठिकाणी मालमत्ता पत्रक जोडणे आवश्यक होते तेथे ते जोडता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मात्र हक्काचे पत्रक मिळाल्याने फार सोईचे झाले आहे, असे यावेळी सरपंच अजय जानवे यांच्यासह गावकऱ्यांनी सांगितले.