श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार- सेलूच्या तहसीलदार शकुंतलाताई पाराजे
गणेश खोडके/दै.जन-संग्राम सेलू : श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार, असे प्रतिपादन करत सेलूच्या तहसीलदार माननीय शकुंतला ताई पाराजे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, रोज कार्यालयात अनेक लोक विविध अडचणी आणि ताणतणाव घेऊन येतात. अशा वेळी त्या व्यक्तीने समाधानाने आणि आनंदाने परत जावे, हेच माझे ध्येय असते. जीवनातील धावपळीत देवाचे स्मरण आणि ध्यान करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. ब्रह्माकुमारी शिवशक्ती भवन, भगत ले-आउट, सेलू यांच्या वतीने विश्व परिवर्तन मे महिलाओ की भमिका या विषयावर जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ६ मार्च २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमात वर्धा सेवा केंद्राच्या संचालिका माधुरी दीदी यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, नारी ही पहाडासारखी विशाल आहे. प्रत्येक घरामध्ये दुर्गा, अंबा, सरस्वती आणि महाकाली या देवींच्या रूपात तिची पूजा केली जाते आणि घराला स्वर्ग बनवण्याची जबाबदारी स्त्री पार पाडत. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेलू सेवा केंद्राच्या संचालिका दर्शना दीदी यांनी नारी ही विश्व परिवर्तनाची आधारस्तंभ आहे असे सांगत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी दामिनी पथकाच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक तारा ताकसांडे आणि दिपाली देशमुख यांनी महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच माहेरी शांती निवास, सेलू येथील मायाताई शेळके यांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमात कुमारी तन्वी सोनटक्केयांनी सुंदर नृत्य सादर केले, तर रेणु दिदींनी महिला दिनावर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनवैष्णवी दिदींनी केले आणि शेवटी रेणु दिदींनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणातसंपन्न झाला.








