राम नगर पोलीस तपास बेपत्ता? 20 दिवसांनंतरही अटक नाही: नागरिकांमध्ये संताप
प्रतिनिधी/दै.जन-संग्रामवर्धा : वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गंभीर गुन्हा दाखल होऊन तब्बल २० दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी पावडे चौक परिसरातील फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी पप्पू दांगट विरोधात हप्तावसुली व खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या आरोपीने ८ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अद्याप फरार असून, महिलांची छेडछाड, अश्लील शिवीगाळ आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेला हा सराईत गुन्हेगार पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे की, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून एकच आरोपी फरार आहे आणि रामनगर पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार?
विशेष म्हणजे, एकेकाळी मोठमोठ्या गुन्हेगारांचा माग काढल्याचा दावा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. एलसीबी गाजवली असे सांगणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जर एक कुख्यात गुन्हेगार मोकाट फिरत असेल, तर ही पोलिसांसाठी शरमेची बाब नाही का? असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, आरोपी इतक्या काळापासून फरार राहण्यात यशस्वी कसा ठरत आहे, याबाबतही विविध चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांमध्ये या सराईत गुन्हेगाराला कुणाचे संरक्षण तर मिळत नाही ना? असा संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
आता सर्वांचे लक्ष रामनगर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले असून, कुख्यात पप्पू दांगटला अटक करून पोलीस आपली प्रतिमा वाचवणार की आरोपी आणखी काही दिवस पोलिसांना गुंगारा देणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








