वर्धा-कळंब-वर्धा रेल्वेगाडी शेगावपर्यंत वाढविण्याची खासदार अमर काळे यांची मागणी

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
वर्धा : नांदेड रेल्वे मार्गाचे काम अद्याप पूर्णपणे पूर्ण झालेले नसताना केवळ कळंबपर्यंत रेल्वे मार्ग तयार झाल्याने रेल्वे प्रशासनाने निवडणुका लक्षात घेऊन घाईगडबडीत वर्धा-कळंब रेल्वेगाडी सुरू केली आहे. प्रत्यक्षात वर्धा ते कळंब हे अंतर अवघे ५० किलोमीटर असल्यामुळे सदर रेल्वेगाडीला अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत नसून ही गाडी तोट्यात चालत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी मध्य रेल्वे, मुंबईचे महाव्यवस्थापक यांना पत्र पाठवून वर्धा-कळंब रेल्वेगाडीचा विस्तार शेगावपर्यंत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, सदर रेल्वेगाडी शेगाव-वर्धा-कळंब व कळंब-वर्धा-शेगाव अशी चालविण्यात आल्यास या गाडीला प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद मिळून प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

कळंब येथे प्रसिद्ध चिंतामणी देवस्थान असून शेगाव येथे संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांना रेल्वेमार्गाने जोडण्यात आल्यास भाविकांना दर्शनासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल. कळंब येथील भाविकांना शेगाव येथे तसेच शेगाव येथील भाविकांना कळंब येथे जाणे अधिक सोयीचे होईल. यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.

खासदार अमर काळे यांनी पुढे सुचविले आहे की, चिंतामणी देवस्थान आणि शेगावच्या गजानन महाराज संस्थान यांना जोडणाऱ्या या रेल्वेगाडीला चिंतामणी राणा एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे. गाडीचा विस्तार केल्यास सध्या तोट्यात सुरू असलेल्या या रेल्वेगाडीला अधिक प्रवासी मिळतील व ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सदर मागणीचा सकारात्मक विचार करून रेल्वे प्रशासनाने कळंब-वर्धा रेल्वेगाडी तात्काळ शेगावपर्यंत वाढवावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *