राज्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा!

राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार मा. श्री. रामदास तडस यांनी नागपूर येथील रामगिरी येथे भेट घेऊन सकारात्मक चर्चा.

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
वर्धा : राज्यातील कुस्ती, कबड्डी आणि ग्रामीण क्रीडा विकासाला चालना देणारे महत्त्वाचे प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार मा. श्री. रामदास तडस यांनी नागपूर येथील रामगिरी येथे भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

बैठकीत सर्वप्रथम राज्यातील आदिवासी वसतीगृहांमध्ये कुस्ती आणि कबड्डी खेळासाठी आधुनिक दर्जाच्या मॅट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी व खेळाडू उत्कृष्ट क्षमता असूनही आवश्यक सुविधा नसल्यामुळे मागे पडतात. आधुनिक प्रशिक्षण साहित्य उपलब्ध झाल्यास ग्रामीण आणि आदिवासी भागातून राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतील, असा विश्वास श्री. तडस यांनी व्यक्त केला. त्यानंतर राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची महाराष्ट्र कुस्तीगीर संघ द्वारा ”महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. विदर्भातील कुस्तीप्रेमींची मोठी संख्या, नागपूरचे भौगोलिक महत्त्व आणि वाढत्या क्रीडा सुविधा लक्षात घेता या स्पर्धेचे आयोजन नागपुरात झाल्यास संपूर्ण विदर्भातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल, तसेच कुस्ती चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असे मत बैठकीत मांडण्यात आले.

बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामीण भागात ”देवाभाऊ क्रीडा अकादमी”ची स्थापना. या अकादमीच्या माध्यमातून कुस्ती, कबड्डीसह इतर ग्रामीण खेळातील होतकरू खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण, निवासी सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीत विदर्भातील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अनिल तोडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा योगदानाच्या आधारे शासकीय नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली. देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाने सन्मान आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास इतर युवा खेळाडूंनाही मोठी प्रेरणा मिळेल, असे श्री. तडस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रस्तावांचे गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांकडून आवश्यक त्या पातळीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार मा. श्री. रामदास तडस यांना देण्यात आले.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या भेटीदरम्यान आदिवासी वसतीगृहांसाठी कुस्ती व कबड्डी मॅट उपलब्ध करून देणे, नागपूर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, ”देवाभाऊ क्रीडा अकादमी” ची स्थापना तसेच विदर्भातील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अनिल तोडकर यांना शासकीय सेवेत संधी देण्याबाबतचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आले. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देणारे आणि खेळाडूंच्या हिताचे हे प्रस्ताव सकारात्मक दृष्टीने विचारत घेतले जातील, असा दृढ विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली या सर्व मागण्यांना निश्चितच न्याय मिळेल आणि राज्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा व दिशा प्राप्त होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय ॲमेचर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *