समृद्धी महामार्ग अपघातग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या

मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना ५ लाख; किरकोळ जखमींना २ लाख देण्याची खासदार अमर काळेंची मुख्यमंत्र्याकडे मागणी

प्रतिनिधी/दै. जन-संग्राम वर्धा : समृद्धी महामार्गावर २ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार अमर शरदराव काळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाख रुपये, तर किरकोळ जखमींना २ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील सिंदी (मेघे) येथील नागरिक दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी अकोला जिल्ह्यात गेले होते. मूर्ती घेऊन परतत असताना पुलगाव-धामणगावदरम्यान समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू, १ जण गंभीर जखमी आणि ६ जण किरकोळ जखमी झाल्याचे खासदार काळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पात्रात नमूद केले आहे.

दुर्विची मूर्ती घेऊन आनंदने परताना नागरिकांच्या प्रवासाचा अचानक झालेला हा दुर्दैवी शेवट ठरला आहे. या दुर्घटनेत कुटुंबातील व्यक्ती गमावलेल्या नागरिकांसमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने कोणताही विलंब न करता आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे खासदार काळे यांनी म्हटले आहे. शासनाकडून मिळणारी मदत कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत आधार देऊ शकते. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपये देण्यात यावेत, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.

खासदार काळेनी कुटुंबीयांची घेतली भेट अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे असतानाही मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली. या कुटुंबावर आलेले संकट आणि त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

अपघाताची कारणे स्पष्ट होणे आवश्यक या दुर्घटनेत नेमकी चूक कुठे झाली, वाहनाला महामार्गावर प्रवेश कसा मिळाला आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा प्रक्रियेचे पालन झाले होते का, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे गरजेचे आहे.

या प्रकरणात चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. परंतु त्या आधी शासनाने मदत तातडीवा द्यावी.

अपघातग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी राहण्याची भूमिका या दुर्घटनेत सात नागरिकांचा मृत्यू झाल्याने सिंदी (मेघे) परिसरात दुःखायचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांचा आधार असलेले सदस्य अचानक गेल्याने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जखमी नागरिकांच्या उपचाराचा खर्चही त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आर्थिक भार ठरू शकतो. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांसह गंभीर आणि किरकोळ जखमींनाही शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना ५ लाख आणि किरकोळ जखमींना २ लाखांची मदत तातडीने मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *