हनुमान टेकडीवरील गणेश विसर्जन कुंडाची खासदार अमर काळे यांनी केली पाहणी; पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचे केले कौतुक

नदी प्रदूषण रोखण्यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचाचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम

वर्धा : गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने वर्धा शहरातील हनुमान टेकडी येथे दरवर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष विसर्जन कुंड तयार करण्यात येते. या उपक्रमाचे यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या गणपती महाआरतीला खासदार अमर काळे यांनी उपस्थित राहून उपक्रमात सहभाग घेतला.

वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारातून हा पर्यावरणपूरक उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन न करता हनुमान टेकडीवरील विसर्जन कुंडात विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे नदीपात्रात मूर्ती, निर्माल्य तसेच अन्य पूजासाहित्य जाण्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे.

यावेळी आयोजित महाआरतीला खासदार अमर काळे उपस्थित राहिले. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने डॉ. सचिन पावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार अमर काळे यांचे स्वागत केले. यावेळी मंचाचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी आलेले वर्धकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व पूजासाहित्य नदीत विसर्जित केले जाते. त्याचा परिणाम नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर होऊन जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय जनजागृती मंचाने पर्यावरणपूरक विसर्जनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. नागरिकांनी नदीत विसर्जन न करता तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडाचा वापर करावा, यासाठी मंचाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.

खासदार अमर काळे यांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारचे विसर्जन कुंड आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची व्यवस्था केवळ वर्ध्यातच नव्हे, तर राज्यातील आणि देशातील विविध शहरांमध्ये राबविल्यास नद्यांचे प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

याबरोबरच वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविण्यासाठी जलपुनर्भरणायचा उपक्रमही राबविला जात आहे. डॉ. सचिन पावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरविण्याची व्यवस्था करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे रस्ते, काँक्रीटची बांधकामे आणि इतर पक्क्या संरचना झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी भूजलपातळीवर त्याचा परिणाम होत असून भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरण करण्याचा संदेश वैद्यकीय जनजागृती मंच सातत्याने देत आहे.

डॉ. सचिन पावडे यांनी या उपक्रमाचे महत्व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून, शासकीय कार्यालयांमध्येही पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरण करण्याच्या प्रयोगाला प्रोत्साहन मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम व्यापक करण्याची गरज- खासदार अमर काळे

गणेश विसर्जन कुंड आणि पावसाच्या पाण्याच्या जलपुनर्भरण या दोन्ही उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर खासदार अमर काळे यांनी डॉ. सचिन पावडे व वैद्यकीय जनजागृती मंचाच्या कार्याचे कौतुक केले. जलसंधारण, नदी प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची व्याप्ती अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नदी, पाणी आणि पर्यावरण हे आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य आहे. गणेशोत्सवासारख्या श्रद्धेच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन वैद्यकीय जनजागृती मंचाने वर्ध्यात सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच जनजागृती करणारा आहे. अशा प्रकारचे उपक्रम राज्यभर आणि देशभर राबविले गेले, तर नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासोबतच जलस्रोतांचे संवर्धन आणि भूजलपातळी वाढविण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *