जास्तीत जास्त युवकांना मेळाव्यातून रोजगार मिळेल असे नियोजन करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम
वर्धा : जिल्ह्यात दिनांक २९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग घ्या. त्यांच्याकडील अधिकाधिक रिक्त पदे या मेळाव्यातून कशी भरता येतील, यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील युकांसाठी हे मेळावे मोठी संधी असल्याने जास्तीत जास्त युवकांना यात सहभागा करून घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सुधाकर झळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यात पदवी व पदव्युत्तर युवकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळेल यासाठी प्रयत्न करावे. मेळाव्यात येणाऱ्या युवक युवतींची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या सुविधा मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. मेळाव्याच्या ठिकाणी कंपन्यांसाठी स्वतंत्र दालने उबे करावे. नामांकित कंपन्यामार्फत निवड करण्यात आलेल्या युवकांना मेळाव्याच्या ठिकाणीच नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्यात.

मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाने उद्योग विभागाच्या मदतीने नामांकित कंपन्यांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून त्यांच्याकडील रिक्त पदे, मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात येणारी पदे यांची माहिती संकलित करावी. जास्तीत जास्त कंपन्यांनी उपस्थित राहून रोजगार इच्छुक युवकांच्या मुलाखती घ्याव्या व त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे नियोजन करण्याचे निर्देश दिले.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत राज्यात एकाच दिवशी ५०० पेक्षा अधिक तर जिल्ह्यात ११ रोजगार मेळावे, प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक युवकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, ही शासनाची यामागणी भूमिका आहे. त्याच भूमिकेतून जिल्ह्यात हा मेळावा पार पाडावा, असे पालकमंत्री म्हणाले. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे त्यांना योग्य रोजगाराची संधी तसेच आवश्यक मार्गदर्शन मेळाव्यातून करण्यात येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक, युवतींनी https://forms.gle/ vBTzRQKYBBuBTreme या गुगल लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार महाकुंभ
अनेकांत स्वाध्याय मंदिर, रामनगर वर्धा, कला वाणिज्य महाविद्यालय आर्वी, आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय आर्वी, लोकमान्य महाविद्यालय आष्टी, मॉडेल हाबस्कूल कारंजा, हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव, रामदासजी तडस अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळी, रा. सु. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट, लघु उद्योग भारती (श्याम बाबा ट्रेडर्स) हिंगणघाट, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर, डॉ. आर. जी. भोयर महाविद्यालय सेलू येथे मेळावे होणार आहे.

मेळाव्याच्या माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सिक्हिल लाईन, वर्धा किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२७५६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.सुधाकर झळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *