लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख रस्त्यांसाठी ८०० कोटींचा सीआरएफ निधी द्या

 

खासदार अमर काले यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी; खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक

प्रतिनिधी / दै. जन-संग्राम
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा आधार असलेल्या मात्र सध्या अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या तीन प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत तब्बल ८०० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार अमर काले यांनी केली आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्त्यांची कामे यापूर्वी सीआरएफ निधीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. मात्र पुलगाव-विजयगोपाल-शिरपूर, वर्धा-वायफड -रसुलाबाद-सोरटा तसेच वर्धा-दिग्रस-मांडवा या तीन महत्त्वाच्या मार्गांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाली आहे. रस्त्यांवर जाగోजागी मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, साधी दुचाकी चालविणेदेखील धोकादायक व जिकिरीचे झाले आहे. चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवरही या खराब रस्त्यांचा मोठा परिणाम होत आहे.

या तिन्ही मार्गांवर अनेक ग्रामीण गावे जोडलेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रस्ते शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार आणि दैनंदिन गरजांसाठी शहराशी जोडणारे जीवनवाहिनीचे मार्ग आहेत. गावातील शाळकरी मुले शिक्षणासाठी शहराकडे येतात, रुग्ण उपचारासाठी शहरात येतात, तर शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक विविध कामांसाठी या मार्गांचा नियमित वापर करतात. मात्र रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पुलगाव-विजयगोपाल-शिरपूर मार्ग हा पुढे तुळजापूर-यवतमाळ मार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्याचप्रमाणे वर्धा-वायफड -रसुलाबाद-सोरटा मार्ग हा वर्धा-आर्वी-पुलगाव मार्गाशी जोडणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. तर वर्धा-दिग्रस-मांडवा मार्ग हा ग्रामीण भागाला प्रमुख मार्गाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. त्यामुळे या तिन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण होणे आवश्यक आहे.

या रस्त्यांच्या दुरुस्थेबाबत नागरिकांडून खासदार अमर काळे यांच्याकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या या मागणीची तातडीने दखल घेत खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून निधीची मागणी केली आहे.

खासदार काळे यांनी वर्धा-वायफड -रसुलाबाद-सोरटा मार्गासाठी २०० कोटी रुपये, वर्धा-दिग्रस-मांडवा मार्गासाठी २०० कोटी रुपये आणि पुलगाव-विजयगोपाल-शिरपूर मार्गासाठी ४०० कोटी रुपये, असा एकूण ८०० कोटी रुपयांचा निधी सीआरएफ अंतर्गत मंजूर करून तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

या निधीतून तिन्ही रस्त्यांचे आवश्यक त्या दर्जाने मजबूतीकरण व दुरुस्ती झाल्यास वर्धा लोकसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासामार्क सक्षम रस्ते व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्यांची कामे विलंब न करता हाती घेणे गरजेचे असल्याचे खासदार अमर काळे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागाला शहराशी जोडणारे हे रस्ते केवळ दळणवळणाचे मार्ग नसून नागरिकांच्या विकासाची जीवनवाहिनी आहेत. त्यामुळे या तिन्ही रस्त्यांसाठी मागणी केलेला ८०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून कामांना गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *