अभियान काळात जास्तीत जास्त सेवा, योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
प्रतिनिधी/दै. जन-संग्राम
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ प्रभाविपणे उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या জন্মनिमित्त संपूर्ण राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे, अभियान काळात जिल्ह्यात विविध शासकीय सेवा, योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा, त्यादृष्टीने प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री यांनी सेवा संकल्प अभियानाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अभियान दि. १७ ऑक्टोबर पर्यंत एक महिना राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महसूल विभागाने पट्टे वाटप, विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र वाटपावर भर द्यावा. विविध महसुली सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी तालुका, मंडळस्तरावर शिबिरे आयोजित करावे, विविध विभागांच्या सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. गावभेट कार्यक्रमाद्वारे गावातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे पालकमंत्री म्हणाले.
उद्योग विभागाने उद्योग स्नेही ग्रामपंचायत हा उपक्रम राबवावा. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा जास्तीत जास्त युवकांना लाभ होईल, असे नियोजन करावे. शिक्षण विभागाने शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या २५ वर्षाच्या काळात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले, त्याची जनजागृती होण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात यावे. आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांच्या व विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची यादरम्यान जनजागृती करावी. लाभार्थीचे मेळावे आयोजित करावे. महिला बालविकास विभागाने नियोजित केलेला माझी अंगणवाडी माझी जबाबदारी हा उपक्रम उत्तम असून तो प्रभावीपणे राबविण्यात यावा. कृषि विभागाने पात्र महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर या दरम्यान राबवावी, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने रुग्ण तपासणी, रक्तदान शिबिरसह विविध योजनांचा लाभ या दरम्यान द्यावा. सर्वसामान्यांसाठी डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, नळ जोडणी असे विविध स्तरावरील कार्यक्रम घेण्यात यावे. घरकुल लाभार्थ्यांना सूर्यघर योजनेचा लाभ देण्याची मोहीम या दरम्यान राबवावी. ग्रामस्तरावर विविध प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रम घेण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी जिल्ह्यात अभियानांतर्गत होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली, विभागांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या आपल्या विभागाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, असे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी सुरुवातीस अभियान तसेच महिनाभर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.








