गवळाऊ गायींच्या गोमयापासून ईको फ्रेंडली गणपती
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम
वर्धा : गवळाऊ शासकीय पशु पैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट, हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत गवळाऊ गायींच्या गोमयापासून पर्यावरणपूरक ईको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मूर्ती विक्रीचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमवण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमवण, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतलकुमार मुकणे, शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राच्या व्यवस्थापक डॉ. पूजा काळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. या मूर्तीची प्रथम खरेदी पराग सोमवण यांनी स्वतः केली. याप्रसंगी शासकीय पशुपैदास प्रक्षेत्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी, जिल्हा व्यवस्थापक विपणन मनीष कावडे, उपजीविका व्यवस्थापक प्रतीक मुनेश्वर, कारंजा तालुका अभियान व्यवस्थापक हेमंत काकडे तसेच महिला बचत गटाच्या मंगला कौरती, माला डोंगरे, ममता आसोले, शिल्पा पाटील, सुरेखा इwnaते आदींची उपस्थिती होती.
गोमयापासून मूर्ती बनवण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी गोविज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार, जि. नागपूर येथे प्रशिक्षण घेतले. त्यानुसार मूर्ती तयार करण्यात आल्या असून वर्धा येथे वर्धिनी विक्री केंद्र व कारंजा पंचायत समिती येथे गणपती मूर्ती विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गणपती मूर्ती पवित्र गोमयापासून बनवलेल्या असून शंभर टक्के विघटनशील, पर्यावरणपूरक, समृद्धीचे प्रतीक, नैसर्गिक रंगाचा वापर, झाडासाठी सेंद्रिय खत म्हणून सहज वापर व गवळाऊ संवर्धनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. पर्यावरण हिताच्या दृष्टीने या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.








