वर्ध्यात डीजे व लेझर लाइट मालकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम
वर्धा : विदर्भातील प्रसिद्ध आणि पारंपरिक असा ‘तान्हा पोळा’ उत्सव सिंदी रेलवे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, या उत्सवदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणे आणि प्रतिबंधित लेझर लाइटचा वापर करणे काही डी.जे. मालक व मंडळांना महागात पडले आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या प्रतिबंधनात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंदी रेलवे पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात नागपूरसह अन्य ठिकाणच्या डीजे मालकांबर गुन्हे दाखल झाले आहेत.
नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आणि कानठळ्या बसवणाऱ्या डी.जे. च्या आवाजाच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी उत्सवापूर्वी सर्व मंडळे आणि डी.जे. धारकांची संयुक्त बैठक घेऊन नियमांची जाणीव करून दिली होती. तसेच लेझर लाइटमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बंदी घातली होती. पोळा उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात आली होती.
वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, ३५ सहाय्यक/उपनिरीक्षक, २७९ पोलीस कर्मचारी आणि १७४ होमगार्ड असा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. आवाजाचे डेसीबल मोजण्यासाठी १ पोलीस उपनिरीक्षक व ५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने पोळ्याच्या दोन दिवस आधीच शांतता काळातील मूळ आवाजाचे नमुने घेऊन पंचनामे केले होते. उत्सवाच्या दिवशी कानat असह्य आवाज निर्माण करणाऱ्या व लेझर लाइटचा वापर करणाऱ्या खालील डी.जे. मालक व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
१) साई KGN डी.जे. साऊंडचे मालक सौरभ नेवारे (रा. नागपूर)
२) अमेरिकन मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ डंभारे (रा. सिंदी रेलवे)
३) चांदतारा धुमाल डी.जे. साऊंडचे मालक सोनू बघेल (रा. नागपूर)
४) गणेश दुम्पलवार (रा. सिंदी रेलवे)
५) गुरुनानक धुमाल पार्टीचे मालक करण बावणे (रा. नागपूर)
६) भोई समाज मित्र परिवाराचे पदाधिकारी अजय बावणे (रा. सिंदी रेलवे)
७) लष्कर धुमाल डी.जे.चे मालक मो. अबरार (रा. वर्धा)
८) मित्र परिवार सिंदी रेलवेचे मालक मिलिंद बेलखोडे (रा. सिंदी रेलवे)
९) सूरज काटोले (रा. सिंदी रेलवे) व इतर मंडळ.
नोटिस व परवानगीच्या अटींचा भंग केल्यामुळे पोलीस ठाणे सिंदी रेलवे येथे अपराध क्र. ३३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१, १३६, १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून संबंधित डी.जे. साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. ही कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरेंद्र निस्वादे, पो.उप.नि. ओम कलेगुरवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. यापुढे वर्षभरात येणाऱ्या कोणत्याही धर्मीय सण-उत्सवांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडल्यास अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.








