इवलाश्या जागेत हजारावर घरटी; पाणपक्षी नांदतात इथे सुखाने!
प्रतिनिधी/दै. जन-संग्राम
हिंगणघाट : गणना करणे म्हणजे त्या प्रजातीवर लक्ष ठेवून राहणे. असा अभ्यास हा सोपा नसतो. त्यातही उडणाऱ्या पक्षाच्या अधिवासाबाबत अभ्यास करण्याची बाब कठीणच. पण एक संस्था ही बाब नियमाने पार पाडत आली आहे. दरवर्षी पक्ष्यांची घरटी मोजली जातात व मग त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास प्राधान्य दिले जाते.
हिंगणघाट येथील तहसील कार्यालय परिसर विदर्भातील सर्वात मोठी पाणपक्षी मिश्र वसाहत असल्याचे निसर्गासाथी या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रवीण कडू हे सांगतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तहसील कार्यालय प्रांगणातील वृक्षावर असलेल्या पाणपक्षी मिश्र विण वसाहतीतील घरटी गणना दोन टप्प्यात पार पडली.
पहिल्या टप्प्यातील घरटी गणना दिनांक ७ जून २०२६ ला घेण्यात आली. या घरटी गणनेत ५ पाणपक्ष प्रजातीचे एकूण ४३८ घरटी मोजण्यात आली होती. दिनांक ६ सप्टेंबर २०२६ ला घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील घरटी गणनेत ६ प्रजातीचे घरटे आढळून आले असून एक प्रजाती वाढली आहे.
गायबगळा – १०७ घरटी, छोटा बगळा – ५६, छोटा पाणकावळा – २७, भारतीय पाणकावळा – १, रात ढोकरीज – ४०, मोठा बगळा – ३, वापरलेली घरटी – ४१२.
पहिल्या गनेत घरटी ४३८ अधिक ६४६ दुसऱ्या गनेतील घरटी, अशी एकूण १ हजार ८४ घरट्याची नोंद झाली आहे.
हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या परिसरात विदर्भातील सर्वात मोठ्या पाणपक्ष्यांच्या मिश्र विण वसाहतींपैकी एक वसाहत आहे. अनेक पक्षीप्रेमी आणि पक्षी अभ्यासक या वसाहतीला भेट देतात. विशेषतः कीटक नियंत्रक म्हणून या पक्ष्यांचे कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने मोलाचे आहे. यावर्षी या वसाहतीत प्रथमच आकाराने मोठ्या असलेल्या मोठ्या बगळाची तीन घरटी आढळून आली. ही बाब पक्षी अभ्यासकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब. पण यावर्षी वेगळीच समस्या उद्भवली.
घरटी गणनासाठी प्रत्येक झाडाजवळ जाऊन प्रत्येक घरटे पाहावे लागते आणि त्याची नोंद करावी लागते. मात्र संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्यामुळे हे काम अत्यंत त्रासदायक झाले. काही पक्षी अभ्यासकांना काही वेळ थांबावे लागले.
ही परिस्थिती निर्माण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे गेल्या एक ते डेढ़ महिन्यापासून या परिसराची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाला. त्यामुळे कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही. पाणपक्ष्यांचे पालक आपल्या पिलांना प्रथिणयुक्त आहार मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर कीटक, मासे इत्यादी अन्न शोधतात. ते पाणवठे, शेत आणि जंगल परिसरात जाऊन कीटक व मासे पकडतात आणि आपल्या पिलांसाठी ते वसाहतीत आणतात. पिलांना अन्न देण्यासाठी पालक पक्षी मोठी मेहनत घेतात.
मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे अन्नाची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी पिलांना पुरेसे अन्न मिळत नसल्याचे दिसून येते आणि अन्नटंचाईमुळे यावर्षी पिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. मृत पिले आणि पक्षी विण वसाहतीत पडून असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीमुळे अनेक पक्षीप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
वसाहतीची नियमित साफसफाई केली जात नाही आणि त्यानंतर निर्माण झालेल्या दुर्गंधीचे खापर पाणपक्ष्यांच्या विण वसाहतीवर फोडून या वसाहतीला बदनाम केले जात आहे का? असा प्रश्न काही पक्षी अभ्यासक उपस्थित करीत आहेत. पाणपक्ष्यांमुळे दुर्गंधी निर्माण होत आहे, असे चित्र निर्माण करून या हेरॉरीला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये. उलट पक्ष्यांच्या अधिवासाची योग्य स्वच्छता आणि व्यवस्थापन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या परिसराची आठवड्यातून किमान दोन वेळा नियमित स्वच्छता करण्यात यावी. दुर्गंधी कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यात याव्यात. फिनाईल किंवा पक्ष्यांना अपायकारक रसायनांची फवारणी करू नये. अशा रसायनांमुळे पक्ष्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
पक्षी आणि परिसरासाठी सुरक्षित अशा पद्धतीने स्वच्छता करण्यात यावी. काही मृत पक्षी दीर्घकाळ पडून राहिल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. सध्या या परिसरात ५० पेक्षा जास्त मृत पक्षी पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. पाणपक्ष्ी ही दुर्गंधीची समस्या नसून आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांची विण वसाहत वाचवणे म्हणजे निसर्गाचा एक महत्त्वाचा वारसा जपणे होय.








