आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करावा : खासदार अमर काळे
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम
वर्धा : गुण-गौरव सोहळा हा केवळ एक व्यक्तीच्या यशाचा सत्कार नसतो; तर त्या व्यक्तीच्या यशामागे असलेल्या कुटुंबाचा, संस्कारांचा, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, सहकाऱ्यांच्या सहकार्याचा आणि समाजाच्या शुभेच्छांचा तो गौरव असतो.
मला नोकरी हवी आहे याऐवजी मला ज्ञान हवे आहे कौशल्य हवे आहे आणि माझ्यासोबत इतरांसाठीही रोजगार निर्माण करायचा आहे, अशी तरुण पिढी निर्माण झाली, तर भारताला विकसित राष्ट्र बनण्यापासून कोणीही रोखु शकणार नाही कष्ट करा, ज्ञान मिळवा, संशोधन, नवनिर्मिती करा आणि आपल्या यशाचा उपयोग समाजासाठी करा असे मौलिक विचार वर्धेचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.
ते १६ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम, विश्व सिंधी सेवा संगम, स्नेहालय संख्या तथा सत्याश्रम मंडळ वर्धा द्वारा हॉटेल वृंदावन सभागृहात आयोजित डॉ पलाश मोहन गौरशेट्टीवार यांचा गुणगौरव सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कारromyalgia (अध्ययस्थानी) वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुधिर पांगूळ तर प्रमुख अतिथी म्हणून चेतना डी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद सवई, ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र चांदेकर, सेंट थॉमस जुनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्रिती विजय सत्यम, ज्येष्ठ साहित्यकार डॉ. शांतीलाल कोचर गोल्डी, प्राचार्य डॉ. विद्या कळसाईत प्रा. डॉ अनिस बेग, नवीन आहुजा, मोहन गौरशेट्टीवार ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इम्रान राही, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, माजी प्रदेशअध्यक्ष विजय नाखले आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
एखादी व्यक्ती ज्ञान मिळवून ते समाजाला परत देते, विद्यार्थ्यांना घडवते, संशोधन करते आणि पुढच्या पिढीला दिशा देते, तेव्हा त्या यशाला खऱ्या अर्थाने सामाजिक मुल्य प्राप्त होते अशी भावना रविन्द्र चांदेकर यांनी व्यक्त केली. डॉ. पलाश गौरशेट्टीवार यांचे यश विशेष महत्त्वाचे ठरते कारण त्यांनी केवळ पि.एच.डी. पदवी मिळवलेली नाही, तर त्यांनी शिक्षण, संशोधन प्रशासन, व नवोन्मेष आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाचा एक सुंदर संगम घडवून आणला आहे असे मत इमरान राही यांनी व्यक्त केले डॉ पलाश यांचा यशाचा अभिमान त्यांच्या आई- वडिलांना कुटुंबाना जितका आहे, तितकाच तो संपूर्ण वर्धा शहराला आहे असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. सुधिर पांगूळ यांनी व्यक्त केले.








