एव्हीबीआरएच,वर्धा येथे पाच वर्षांच्या मुलावर हृदयाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी

 प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : ग्रामीण भागातील पाच वर्षांच्या मुलावर जन्मजात हृदयाचा गंभीर आजार असलेल्या ट्रायकस्पिड एट्रेशिया या समस्येवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात (एव्हीबीआरएच) यशस्वीपणे फॉन्टन कंप्लीशन सर्जरी करण्यात आली. या आजारात हृदयाची उजवी बाजू पूर्णपणे विकसित होत नाही आणि ती कार्य करू शकत नाही. अशा प्रकारच्या आजारांमध्ये बालपणात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दोन ते तीन जटिल शस्त्रक्रिया कराव्या लागतात. आर्थिक अडचणी आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक मुलांना जीव गमवावा लागतो. या मुलाची पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया मुंबई येथे झाली होती. मात्र, अंतिम फॉन्टन शस्त्रक्रियेसाठी पालक अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते.

मोठ्या रुग्णालयांमधील प्रतीक्षा आणि मुंबई किंवा हैदराबादसारख्या शहरांमध्ये जाण्याचा त्रास लक्षात घेऊन त्यांनी एव्हीबीआरएचमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. बाल हृदय शस्त्रक्रियेत विशेष प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे आता विदर्भातील रुग्णांना अशा जटिल शस्त्रक्रिया आपल्या जवळच्या भागातच करून घेणे शक्य झाले आहे. तसेच सरकारच्या आरोग्य योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार, प्रवास आणि जेवणासाठी मदत मिळत आहे. बाल हृदयराग तज्ज्ञ डॉ. वभव राऊत आणि डॉ. शंतनू गोमासे यांनी रुग्णाची सविस्तर तपासणी केल्यानंतर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. गौरी दातार यांनी फॉन्टन कंप्लीशन सर्जरी यशस्वीपणे केली.

शस्त्रक्रियेदरम्यान भूल आणि अतिदक्षता विभागाची जबाबदारी डॉ. भक्ती पाटील यांनी सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर मुलाला स्थिर प्रकृतीत कार्डियाक आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर विशेष वैद्यकीय देखरेख आणि काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. कोणतीही गुंतागुंत न होता ६ नोव्हेंबर रोजी मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ग्रामीण रुग्णालयातही जन्मजात हृदयाच्या जटिल आजारांवर विशेष उपचार उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एआयएचईआर (डीयू)चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. नीलेश अग्रवाल, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, डायरेक्टर हॉस्पिटल्स डॉ. चंद्रशेखर महाकाळकर आणि एव्हीबीआरएचचे चीफ मेडिकल सुपरिंर्टेंडेंट डॉ. अभय मुडे यांनी सर्जरी विभागांतर्गत कार्यरत पीडियाट्रिक कार्डियाक केअर टीमच्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *