आषाढी एकादशीनिमित्त समुद्रपुरात चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले सर्वांचे लक्ष
प्रमोद झिबड/दै. जन-संग्रामसमुद्रपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठाच्या विद्यार्थीनी पारंपरिक वारी वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम यांच्या अखंड जयघोषात भव्य दिंडी काढत भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल! या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. हातात भगवे ध्वज, डोक्यावर तुळशी वृंदावन, पारंपरिक वारी वेश आणि विठ्ठलभक्तीचा उत्साह अशा वातावरणात निघालेल्या या दिंडीत महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे जीवंत दर्शन घडले.
यावेळी दिंडीतील पालखीत भारतीय संविधानाचा ग्रंथ ठेवून विद्यार्थीनी विज्ञाननिष्ठ विचार, संवैधानिक मूल्ये आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घालात समाजापुढे एक प्रेरणादायी संदेश दिला. भक्तीबरोबरच सामाजिक जाणीव आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.
दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक अमोल डोंगरे, नीतू वाघ, श्वेता वैद्य, राकेश गेडम, आचल नरांजे आणि रविंद्र जिवतोडे यांनी परिश्रम घेतले. चिमुकल्यांचा उत्साह, शिस्त आणि भक्तिमय वातावरण पाहून पालकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले.








