तालुक्याच्या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँक चार महिन्यांपासून ठप्प

हजारो खातेदारांची पायपीट सुरूच; केंद्र ममदापुरात हलविल्याची चर्चा, प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिक संताप
प्रतिनिधी / दै. जन-संग्राम

आष्टी (श.) : आष्टी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असतानाही येथील पोस्ट कार्यालयातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची (IPPB) सेवा गेल्या चार महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प असल्यार हजारो खातेदारांची मोठी गैरसोय होत आहे. पैसे जमा करणे, काढणे किंवा इतर व्यवहारांसाठी पोस्ट कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना सेवा उपलब्ध नाही असे सांगून परत पाठविले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाने आर्थिक समावेशनाच्या उद्देशाने आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. त्यावर विश्वास ठेवून आष्टी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी पोस्ट कार्यालयात ख्राइनची खाती उघडून कार्डही घेतले. सुरुवातीला एका महिला कर्मचाऱ्यामार्फत सेवा सुरळीत सुरू होती. मात्र, त्या कर्मचाऱ्याची ममदापूर येथे नव्याने सुरू झालेल्या डाकघरात बदली झाल्याची चर्चा असून, त्यानंतर आष्टी येथील सेवा अक्षरशः बंद पडली आहे. सेवा देण्यासाठी कोणताही पर्यायी कर्मचारी उपलब्ध नसल्याने खातेदारांना स्वतःच्या पैशासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुक्याच्या मुख्य ठिकाणीच अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील नागरिकांनी नेमके कुठे जावे, असा संताप सवाल आता उपस्थित होत आहे.

चार महिन्यांपासून सेवा बंद असतानाही संबंधित विभागाने पर्यायी व्यवस्था का केली नाही? कायमस्वरूपी कर्मचारी का नियुक्त केला गेला नाही? डिजिटल बँकिंगचा गाजावाजा करणाऱ्या यंत्रणेचे हे अपयश नाही का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.

आष्टी तालुक्यातील हजारो खातेदारांची होणारी गैरसोय तातडीने दूर करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया : रोशनी दिनेश चव्हाण (खातेदार, आष्टी)
शासनाच्या आवाहनावर विश्वास ठेवून मी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आणि ख्राइनचे कार्डही घेतले. शासनाच्या विविध योजनांचे पैसे खात्यात आल्यानंतर ते काढण्यासाठी अनेकदा पोस्ट ऑफिसमध्ये गेले, पण प्रत्येक वेळी ‘सें्टर बंद आहे’ असेच सांगण्यात आले. महिनाभर पायपीट केल्यानंतर केंद्र ममदापुरात हलविल्याचे समजले. माझी ही पायपीट कधी थांबणार? आष्टीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी ख्राइन केंद्र सुरू करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *