महावितरणाची गुंडेशाही?घरमालक नसताना घरात घुसून मीटर काढले

चिमुकल्यासमोर दहशतीचे वातावरण

पलाश उमाटे/दै.जन-संग्राम
वर्धा : राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच वर्ध्यात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक अनुपस्थित असताना घरात घुसून वीजपुरवठा खंडित करणे, जुने मीटर जबरदस्तीने काढून नेणे आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सेवाग्राम रोडवरील वैशालीनगर परिसरात जिवतोडे कुटुंबाच्या घरी ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कुटुंबाचे वीज बिल केवळ एका दिवसाच्या विलंबांमुळे थकीत असताना कोणतीही पूर्वसूचना न देता ६ ते ७ कर्मचारी थेट घरात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, घरात त्या वेळी केवळ लहान मुले होती. कर्मचाऱ्यांनी तोंडाला कपडे बांधलेले असल्याने चिमुकल्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली.

नागरिकांच्या मते, संबंधित कर्मचाऱ्यांकडे महावितरणाचा अधिकृत गणवेश नव्हता, ओळखपत्र नव्हते आणि कोणतेही लेखी आदेशही दाखविण्यात आले नाहीत. त्यामुळे हे अधिकृत कर्तव्य होते की नागरिकांवर दबाव टाकण्याची गुंडेशाही पद्धत? असा सवाल उपस्थित होत आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणाकडून ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी आधीपासूनच समोर येत आहेत. अनेक भागांत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढल्याचे आरोप होत असतानाच आता वैशाली नगरात कुंदन कोचे, नरेश भारद्वाज, माने, बोंडसे व इतर कर्मचारी यांनी थेट घरात घुसून कारवाई केल्याच्या आरोपांनी वाद अधिकच पेटला आहे.

या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी असे वागण्याचे निर्देश कोणी दिले? घरात अल्पवयीन मुले असताना अशा प्रकारे प्रवेश करण्याची परवानगी कोणत्या नियमांत आहे? नागरिकांच्या मानसिक सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न कुंदन कोचे, नरेश भारद्वाज, माने, बोंडसे व इतर कर्मचारी यांनी केलेल्या गुंडगिरी नंतर उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित मनमानीला लगाम घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर आरोपांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *