शालेय आठवणींना उजाळा देणारा १९८८ मॅट्रिक बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
दिलीप पिंपळे/दै.जन-संग्रामसेवाग्राम : यशवंत विद्यालय दहेगाव (गो) व भागशाळा जुनोना येथील १९८८ च्या मॅट्रिकच्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बहुप्रतिक्षित स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) रविवारी सेवाग्राम येथील आश्रम परिसरातील यात्री निवास सभागृहात उत्साहापूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची अधिष्ठात्री देवी माता सरस्वती तसेच स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर १९८८ मॅट्रिक बॅच परिवारातील दिवंगत सहध्यायी व गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्नेहमेळाव्यात उपस्थित गुरुजन व मान्यवरांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी स्वतःचा परिचय करून देताना शाळेतील अविस्मरणीय क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील खोडकर प्रसंग, प्रार्थनेतील आठवणी, डबा वाटून खाण्याचे दिवस, स्नेहसंमेलनातील सहभाग तसेच शिक्षक शिकवत असतानाचे विविध किस्से उपस्थितांसमोर उलगडले. त्यामुळे सभागृहात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी उपस्थित गुरुजन वानखेडे सर, राऊत सर, कीटे सर, साखरे सर, उठाटे सर, धानकुटे सर, राठोड मॅडम तसेच गावातील मान्यवर शंकरराव गावंडे व कृष्णराव घुडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुरुजनांच्या हस्ते सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १९८८ बॅचचे विद्यार्थी तथा प्रसिद्ध साहित्यिक सुरेंद्र गावंडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यमय शैलीत केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दीपक कांबळे यांनी केले.
स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी हुसेन शेख, भास्कर वायगावकर, प्रमोद गिरी, वर्षा बुटे (वानखेडे), वंदना दारुंदे (बरके), सुभाष खुजनारे, वंदना पोथारे (गोडबोले), वंदना गावंडे (नाईक), अनिल सोनपितळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सुमारे ३८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा अमूल्य ठेवा पुन्हा एकदा जपण्याचा संकल्प केला. स्नेह, आदर, कृतज्ञता आणि भावनांनी ओथंबलेल्या या स्नेहमेळाव्याने उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणींचा ठेवा निर्माण केला.








