एल निनोच्या सावटाखाली चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करा
पशुधन वाचविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी- खासदार अमर काळे
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
वर्धा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्याचा फटका शेतीसोबत पशुधनालाही बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या संभाव्य संकटाचा विचार करून वर्धा जिल्ह्यात तातडीने चारा डेपो सुरू करण्यात यावेत, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी वर्धा व अमरावती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार अमर काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एल निनोच्या परिणामामुळे वातावरणात लक्षणीय बदल होत असून पावसाचे प्रमाण घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पशुधनासाठी आवश्यक असलेल्या हिरव्या व सुका चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
वर्धा जिल्ह्यात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असून हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन पशुधनावर अवलंबून आहे. त्यामुळे संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच आवश्यक नियोजन करावे. जिल्ह्यात गरजेनुसार चारा डेपो सुरू करणे, चारा साठवणुकीची व्यवस्था उभारणे तसेच पशुपालकांना वेळेवर मदत मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच प्रशासनाने या संदर्भात आतापर्यंत कोणती कार्यवाही केली आहे, याची माहितीही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार काळे यांनी केली आहे. पशुधनाचे संरक्षण आणि पशुपालकांच्या हितासाठी या विषयाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात अधोरेखित केले.
एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्यास भविष्यातील चारा संकट टाळणे शक्य होणार असल्याचे त्यांनी अपेक्षा व्यक्त होत आहे.








