माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला एकूण १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे मानाचे बक्षीस
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत देवळी नगरपरिषदेला राज्य स्तरावर रु. १ कोटी व विभागीय स्तरावर रु. ७५ लक्ष असे एकूण रु. १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे मानाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. हे यश देवळी शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक ठरले आहे. या अभियानाअंतर्गत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या प्रभावी अंमलबजावणीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते देवळी शहराचा गौरव करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना शहराच्या प्रतिनिधींनी आनंद व समाधान व्यक्त केले. या यशामागे मुख्याधिकारी मा. नेहा आकोडे यांचे सक्षम नेतृत्व, तसेच अभियंता संदीप गायकवाड, स्वच्छता निरीक्षक आशिष ढोबळे,
शहर समन्वयक सुमध भागे याच्या योग्य नियोजनामुळे व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवळी नगरपरिषदेला राज्य व विभागीय स्तरावर मानाचे स्थान प्राप्त झाले. तसेच ग्राउंड स्टाफचा मोलाचा सहभाग राहिला. सुनील भाऊ खोंड, रविभाऊ नांदणे, हरीषभाऊ परिहार, सूरज धोंगडे तसेच सर्व सफाई कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत अभियान यशस्वी केले. पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान देवळी नगरपरिषदेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व प्रत्येक जागरूक देवळीकर नागरिकाला समर्पित करण्यात आला. या सोहळ्यावेळी नगराध्यक्ष श्री. किरणभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष श्री. राहुल चोपडा, मुख्याधिकारी नेहा आकोडे, पाणीपुरवठा अभियंता संदीप गायकवाड तसेच शहर समन्वयक सुमेध भोगे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवळी शहराची प्रगती, स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांची वाटचाल अशीच कायम राहावी आणि स्वच्छ व हरित देवळी या ध्येयासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.









