देवळी नगर परिषदेची निवडणूक रद्द….! देवळीत उडाला गोंधळ….!
किशोर सुरकार/दै.जन-संग्राम देवळी : पाहणी झाली…! पसंती ठरली….! स्थळ, वेळ निश्चित झाले…! पत्रिका वाटप झाल्या…! अन् अचानक हळदीच्या आदल्या दिवशी भटजी, वाजंत्री आणि हॉलवाले गायब झाले…! या घटनेने वर-वधु यांना धक्काच बसला…! असाच काहीसा प्रकार देवळी नगर परिषदेत घडतांना दिसत आहे. देवळी नगर परिषदेची होणारी निवडणूक अचानक ३० नोव्हेंबर रोजी रात्री रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली अन् सगळीकडे एकच गोंधळ उडाला… कुणाला काय होतेय हेच समजत नव्हते.
आज सकाळी जनसग्राम प्रतिनिधीने गावात फेरफटका मारला असता उमेदवार, जनतेचा कानोसा घेतला असता देवळी शहरात सर्वत्र संतापाची लाट दिसून आली आहे. आज दुपारी १२ वाजता अचानकपणे दोन तारखेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आनागोंदी कारभाराविराधात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष नगरपरिषदेचे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांचे नेतृत्वात आज नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देवळीतील सर्व अपक्ष उमेदवार सुद्धा हजर होते. यावेळी किरण ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी आजपर्यंत प्रचारप्रसारावर केलेला खर्च देण्यात यावा व त्यानंतरच निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे . निवडणूक आयोग जनभावनेशी खेळत आहे,
लोकहीताकरिता काम करणार्या अपक्ष उमेदवारांना आर्थिकरित्या कमकुवत करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले. यावेळी देवळी शहरातील सर्व अपक्ष उमेदवार हजर होते. सर्वत्र देवळी शहरामध्ये संभ्रमाचे वातावरण असून निवडणूक आयोगाविरोधात तीव्र असंतोष दिसून येत आहे, याबद्दल देवळी शहरातील नागरिकांचे मते जाणून घेतले असता, काही नागरिकांनी या बुद्धीजीवी निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच काय हे कसे काय नाही समजले….! असा प्रश्न विचारला. तर उमेदवारांनी आतापर्यंत आमचा झालेला खर्च निवडणूक आयोग देणार का? असा प्रश्न विचारला आहे. नागरिकांनी एका राजकीय पक्षावर सुद्धा आरोप केले असून आपला उमेदवाराची स्थिती डामाडोल असल्यामुळेच निवडणूक आयोगाला खेळणे बनवून निवडणूक पुढे ढकल्याचीच चर्चा सर्वत्र शहरात होत आहे. त्यामुळे आता पुन्हा नवा गडी, नवा राज देवळी नगरपरिषदेत होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









