दिवाळीत शेतकऱ्यांना पावसाचे फटके

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम सेलू : जवळपास पंधरवाड्याच्या विश्रांतीनंतर ऐन दिवाळीत शुक्रवार २४ रोजी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची दानादान उडाली आहे. शेतात सवंगणी केलेले सोयाबीनच्या ढिगासह बाजार समितीतील सोयाबीनचे ढीग ओले झाले. तसेच वेचणीसाठी आलेला कापूस सुद्धा भिजला. या संकटामुळे पुन्हा शेतकरी हताश झाला असून रब्बीसाठी जमिनीची मशागत कशी करावी, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. यंदा सततच्या पावसामुळे आणि येलो मॉझेक रोगाने सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. पदरात पडेल ते सोयाबीन काढून रब्बी हंगामाची तयारीला शेतकरी लागला होता.

ज्या शेतकर्यांचे सोयाबीन निघाले त्यांनी चार पैसे मिळतील या आशेने शुक्रवार २४ रोजी बाजार समितीत सोयाबीन विक्रीस नेले होते. अचानक दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सेलू बाजार समितीत शेतकर्यांचे सोयाबीन भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारामुळे शेतकरी आक्रोशित झाले असून संतप्त शेतकर्यांनी सभापती आणि सचिवांना धारेवर धरत रोष व्यत करीत निषेध केला. सभापती आणि सचिव यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत बाजार समिती प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. हिंगणघाट बाजार समितीत सुद्धा काही प्रमाणात शेतमाल भिजला होता. परंतु, भिजलेला सर्व शेतमाल खरेदी केल्यान शेतकर्यांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामाच्या कामात व्यस्त आहेत. परिपव झालेल्या कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र, निसर्गाने पुन्हा एकदा शेतकर्यांची परीक्षा घेतली आहे. शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशांवर पाणी फिरले. वेचणीला आलेला कापूस ओलाचिंब होत असल्याने शेतकर्यांवर निसर्गाचे संकट पुन्हा ओढावत आहे. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणामी बाजारात दर कमी मिळण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकरी नाव्हेंबर महिन्यात गहू आणि चना पेरणीला सुरुवात करतात. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीला विलंब झाला. अद्याप ५० टके सोयाबीन शेतकर्यांच्या शेतातच उभे आहे. परिणामी, सोयाबीन काढणे, जमिनीची मशागत याला वेळ होणार आहे. रब्बी हंगातील पिकांची पेरणी उशिरा होईल, असे शेतकरी बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *