अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खा. अमर काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : अतिउष्णतेमुळे करपलेल्या संत्रा-मोसंबी बागांची खासदार अमरभाऊ काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; त्वरित नुकसान भरपाई देण्याचे प्रशासनाला आदेश.

चालू उन्हाळ्यात वाढलेल्या अतिउष्णतेमुळे आष्टी तालुक्यातील संत्रा आणि मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणावर करपल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यापूर्वी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरभाऊ काळे यांना निवेदन देऊन मोबदल्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत, दिनांक १८ जून रोजी खासदार अमरभाऊ काळे यांनी स्वतः तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन बाधित फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

खासदार अमरभाऊ काळे यांनी आज आष्टी तालुक्यातील वडाळा, वर्धपूर, सत्तारपूर, बोरगाव, धाडी आणि साहूर, तळेगाव येथील फळबागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. उन्हाच्या तीव्रतेमुळे झाडे वाळल्याचे आणि फळगळ झाल्याचे विदारक चित्र या पाहणीदरम्यान समोर आले. संपूर्ण मौजातील परिस्थितीची बारकाईने पाहणी केल्यानंतर, खासदार काळे यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना याचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे, तालुका कृषी अधिकारी बनकर, स्थानिक मंडळ अधिकारी आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते. अधिकाऱ्यांना मैदानावरिल वस्तुस्थिती दाखवून देत खासदार काळे यांनी प्रशासकीय स्तरावर कोणतीही दिरंगाई न करता अहवाल सादर करण्यास सांगितले.

याप्रसंगी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यात ईश्वरभाऊ वरकड, नानासाहेब জামালपुरे, बबनराव कोहळे, सुरज ढोले, गिरीधरजी निंभोरकर, राजू पोटे, सोनवणे सर विजय वाघमारे, हरिभाऊ निंभोरकर, सतीशजी गोहाड, रामदासजी उगले, दिलीप भाकरे, अरुण नेहारे, देवेंद्र उगले, रमेश मसरे, प्रवीण टापरे, राजकुमार कांदे, प्रसाद वरकड, जितू शेटे आदींचा समावेश होता.

खासदार अमरभाऊ काळे यांनी संकटसमयी धावून येत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यामुळे आणि अधिकाऱ्यांना त्वरित मदतीचे आदेश दिल्यामुळे आष्टी तालुक्यातील त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *