बदल्या फक्त कागदावर, कर्मचारी पुन्हा त्याच खुर्चीवर ?

* वर्धा पोलीस दलातील ‘ड्युटी पास संस्कृती’वर प्रश्नचिन्ह; फील्डवरील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
सागर वैद्य/दै.जन-संग्राम
वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मोठ्या गाजावाजात करण्यात येणाऱ्या बदल्या प्रत्यक्षात केवळ कागदोपत्री राहतात का, असा प्रश्न आता पोलीस दलातच उपस्थित केला जात आहे. कारण अनेक कर्मचाऱ्यांची बदली एका पोलीस स्टेशनवर दाखवली जाते, मात्र प्रत्यक्षात ते त्या ठिकाणी हजर न राहता विविध मार्गांनी ‘ड्युटी पास’ मिळवून पुन्हा त्याच कार्यालयात किंवा शाखेत कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही कर्मचारी वर्षानुवर्षे एसपी कार्यालय, एसडीपीओ कार्यालय, गुन्हे प्रगटीकरण पथक (DB), स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष पथके आणि इतर विभागांमध्येच संलग्न राहतात. बदलीचे आदेश निघतात, पण काही दिवसांतच पुन्हा जुन्याच ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते. त्यामुळे बदली प्रक्रियेची पारदर्शकता आणि उद्देश यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे अधिकारी आणि कर्मचारी मात्र मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. अनेकांना नियमित साप्ताहिक सुट्टी तर दूर, कुटुंबासाठी वेळ देणेही कठीण झाले आहे.

दोन वेगवेगळे नियम का?
एकीकडे काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शाखांमध्ये कायमस्वरूपी ‘आश्रय’ मिळतो, तर दुसरीकडे फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार टाकला जातो. यामुळे दलात असंतोष वाढत असल्याची चर्चा आहे.

उपस्थित झालेले प्रश्न

बदल्या झाल्यानंतर कर्मचारी प्रत्यक्षात नवीन ठिकाणी किती दिवस काम करतात ?

ड्युटी पास आणि संलग्नीकरणाचे निकष नेमके काय आहेत ?

काही कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच शाखेत ठेवण्यामागचे कारण काय ?

फील्डवरील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रशासन काय करत आहे ?

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, बदलीचा नियम सर्वांसाठी समान असायला हवा. काहींसाठी कार्यालय आणि काहींसाठी अखंड राबणे, ही व्यवस्था अन्यायकारक आहे.

आता जिल्हा पोलीस प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ पडताळणी करून, बदलींनंतर प्रत्यक्ष हजेरी आणि कामकाजाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा बदल्या फक्त कागदावर आणि कर्मचारी पुन्हा त्याच जागेवर, अशी चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *