एस.टी.चे उत्पन्न वाढीसाठी अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशान्वये वर्धा बसस्थानक परिसरात वाहन धारकांवर धडक कारवाईप्रतिनिधी/दै.जन-संग्राम
वर्धा : महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा विपरीत परिणाम होत असल्याने वर्धा विभागाकडून विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वर्धा बसस्थानक परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग झोन’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वर्धा विभागाने ५ ते १५ जून या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस. टी. महामंडळाच्या महसुलात घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांना पुन्हा एस. टी. कडे वळवणे आणि उत्पन्न वाढवणे या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असून बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वर्धा येथे राबवण्यात आलेल्या कारवाईत सुरक्षा व दक्षता अधिकारी अस्मिता लोणे, सुरक्षा निरीक्षक प्रविण कुचनकर तसेच आगार व्यवस्थापक युधिष्ठिर रामचवरे यांच्यासह स्थानिक वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रवाशांनी सुरक्षित, आरामदायक व आनंददायी प्रवासासाठी महामंडळाच्या एसटी बसचा वापर करण्याचे आवाहन वर्धा आगार प्रमुख युधिष्ठिर रामचवरे यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने धडक मोहीम राबवली. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध बैठकींमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी.च्या महसुलात घट होत असल्याची बाब अधोरेखित केली होती. त्यानुसार मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागांना विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने नागरिकांना बसस्थानक परिसरातील वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.








