विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत न्यायालयाचा नवा आदेश, शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ
प्रतिनिधी/दै.जन-संग्रामपुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने विदर्भातील तापमानाचा विचार करून विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, आता या निर्णयातही बदल करावा लागणार असून, न्यायालयाच्या आदेशानुसार विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १५ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या बाबत समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज बुधवार न्या. अनिल किल्लोर, न्या. राजेश वाकोडे यांच्यासमोर सुनावणी झाली.
शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी २२ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत प्रसिद्ध केलेले परिपत्रक न्यायालयात सादर करून त्याप्रमाणे आदेश देण्याची विनंती केली. मात्र, याचिकाकर्ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने ड. डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी शासनाच्या भूमिकेस विरोध केला.
खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शासनाच्या भूमिकेवर असहमती दर्शवून विदर्भातील शाळा १५ जून आणि २२ जूनपासून सुरू करण्याचा शिक्षण संचालकांचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळा सुरू करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार ३० जूनपासून शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले.








