सुनील केदार यांना सर्वोदय संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्याने गांधी विचाराचे हनन

वर्धा/प्रतिनिधी माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोदय मंडळाच्या राष्ट्रीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष करून गांधी विचाराचे हनन सुरू केल्याची प्रतिक्रिया सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी १६ रोजी दिली.  ते आबा कांबळे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना १४ ते १६ मार्च रोजी सेवाग्राम येथे होणार्या सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय संमेलन कार्यक्रमात माजी मंत्री सुनील केदार यांना स्वागताध्यक्ष करून त्यांच्या नेतृत्वात संमेलन कसे होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे तसेच बँक घोटाळ्यात ते जामिनावर आहेत.

अशा व्यक्तीला सर्वोदय संमेलनात नेतृत्व देऊन गांधी विचाराचे हनन सुरू केले आहे, असा आरोप केला. या संदर्भात सर्व सेवा संघाचे कायर् कारिणी सदस्य अविनाश काकडे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, आ. केदार यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकर्यांसाठी आंदोलन केले होते.

त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्याप्रकरणात ते आरोपी सिद्ध झालेले नाहीत. आ. केदार गांधी विचारावर काम करणार्या राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते गांधी विचाराचे आहेत. ते गांधी विचाराच्या विविध संस्था आणि संघटनांना मदत करतात. त्यामुळे केदार यांना स्वागताध्यक्ष करण्यात आल्याचे काकडे यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. आरोप कोणीही करू शकतात विद्रोही यांच्यावरही अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्लाही काकडे यांनी दिला.

गांधीवादी कांबळे यांचे उपोषण समाप्त

सर्व सेवा संघात गेल्या अनेक वर्षांपासून दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी एकत्र यावे यासह अन्य मागण्यांसाठी आबा कांबळे यांनी चार दिवसांपासून सेवाग्राम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. आज सर्व सेवा संघाचे अध्यक्षचंदन पाल आणि महादेव विद्रोही या दोन्ही गटातर्फे पाच सदस्यीय समिती स्थापन करून दोन्ही गटाचेएकत्रिकरण करण्यासंदर्भात चर्चा होऊन पत्र देण्यात आले. या दोन्ही गटाची २८ फेब्रुवारी रोजी पाटणा येथे होणार्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतरआबा कांबळे यांनी १६ रोजीउपोषण मागे घेतले.