महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनासाठी “बहारी’ सायकलने रवाना

वर्धा/प्रतिनिधी दरवर्षी होणाऱ्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला सायकलने उपस्थित रहाण्याचा संकल्प याही वर्षी बहार नेचर फाउंडेशनच्या साथींनी कायम ठेवला असून यावर्षी १ व २ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आयोजित महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनासाठी बहारचे संस्थापक किशोर वानखडे, दिलीप विरखडे, अमोल मुनेश्वर आणि ड. प्रसाद सोईतकर हे सायकलने रवाना झाले. बहारचे सायकलस्वार पुलगाव, कारंजा (लाड), मेहकर, जालना, पैठण असा मार्गक्रमण करीत शनिवारी सकाळी शेवगावला संमेलन स्थळी पोचणार आहेत. या प्रवासादरम्यान नागरिकांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत शून्य कर्ब उत्सर्जनासाठी सायकल वापरण्याचा आणि त्याद्वारे पृथ्वीच्या तापमान वाढीला रोखण्यास हातभार लावण्याचा संदेश ते देणार आहेत. बहार नेचर फाउंडेशनच्या साथींनी गेल्या काही वर्षांपासून कराड, रेवदंडा (अलीबाग), सांगली, सोलापूर, चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाना तसेच यवतमाळ, चंद्रपूर, लोणार येथील विदर्भ पक्षीमित्र संमेलनाना सायकलने उपस्थित राहून एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे.

यापूर्वी, दि. ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह साजरा करण्यात यावा, या मागणीचे निवेदन घेऊन बहारी वर्धेवरून मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सायकलने गेले होते. सायकल हे शून्य कार्बन उत्सर्जक व आरोग्यदायी वाहन असल्यामुळे त्याचा उपयोग नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन कामांसाठी केला पाहिजे, अशी भूमिका बहार नेचर फाउंडेशनने कायम मांडली आहे. वर्ध्याहून प्रवासाला निघताना या सायकलस्वारांना विनोद सामक, प्राजक्ता विरखडे, दर्शन दुधाने, देवर्षी बोबडे, अतुल शर्मा, जयंत सबाने, दीपक गुढेकर यांनी निरोप दिला. तर बहारचे पदाधिकारी डॉ. बाबाजी घेवडे, संजय इंगळे तिगावकर, राजदीप राठोड, डॉ. आरती प्रांजळे घुसे, पराग दांडगे, घनश्याम माहोरे, पवन दरणे व अन्य पक्षीमित्रांनी सायकलस्वारांना सुखरूप प्रवासाकरिता सदिच्छा दिल्या असून निसर्गप्रेमींनी शेवगाव येथील महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाला मोठ्या संख्येत उपस्थित राहून तेथील वैचारिक व अभ्यासपूर्ण सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *