आर्वी व कारंजा तालुक्यातील त्या १५ गावांसाठी तत्काळ आराखडा तयार करा- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
बैठकीला आ.सुमित वानखेडे, आ.दादाराव केचे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक हरविंदर सिंग, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे, सुधीर दिवे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, दोनही तालुक्यांचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन, जलसंपदा, जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते. आर्वी तालुक्यातील बेढोणा, बोथली पा., बोथली हेटी, चांदणी, गुमगाव, सालदरा, तळेगाव र, किन्हाळा, पांजरा तर कारंजा तालुक्यातील पांजरा गोंडी, दानापूर, कन्नमवारग्राम, खैरवाडा, माळेगाव काळी, सेलगांव उमाटे, चोपण या गावांमध्ये गवळी समाजातील अनेक कुटुंब जणावरांना चारा आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याच्या कालावधीत काही महिन्यांसाठी इतर ठिकाणी स्थलांतरीत होतात. या १५ गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी व चारा उपलब्ध करून स्थलांतर थांबविण्यासाठी विविध विभागांच्यावतीने कोणती कामे तेथे घेतली जावू शकतात, याचा आराखडा येत्या आठवड्यात तयार करावे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामाचे समन्वय करून येत्या मे महिन्यात आराखड्याप्रमाणे जास्तीत जास्त कामे होतील, असे नियोजन करावे. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. येत्या पावसाळ्यात या गावांच्या परिसरात जास्त पाणी कसे थांबता येतील, यासाठी प्रयत्न करावे, असे पालकमंत्री म्हणाले.
जलसंपदा, जलसंधारण, कृषि, वने, पशुसंवर्धन, रोहयो आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी या सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी, आपआपल्या विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार करावे. त्यानंतर एकत्रित कृती आराखडा तयार करून त्यावर नियोजितपणे काम करावे. पुढील वर्षी या गावातून कमीत कमी व त्यापुढील वर्षी पुर्ण स्थलांतरण थांबले पाहिजे, अस त्यानी सागितल. आगाखान, रोटरीसारख्या सामाजिक संस्थांचे योगदान घेण्याच्या सूचना देखील केल्या. आ.सुमित वानखेडे व आ.दादाराव केचे यांनी देखील या गावांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तलाव, नाले, धरणांमधील गाळ काढणे, रोपवन तयार करणे, वन भागात बंधारे, वृक्ष लागवड, पाणी अडवणे व जिरवणे यासारख्या उपाययोजना घेण्याच्या सूचना कल्या. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी तातडीने यावर संबंधितांना सूचना देऊन कार्यवाही करण्यात येतील, असे सांगितले. सुरुवातीस सुधीर दिवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे व गावकऱ्यांनी दरवर्षी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या चारा व पाण्याच्या समस्येची माहिती दिली व तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली.