जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीस दशकपुर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी लोकसेवा हक्क कायद्याच्या तरतुदीचे वाचन करुन उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत निस्वार्थ भावनेने, कालमर्यादेत सेवा पुरविण्याबाबत शपथ दिली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पात्र व्यक्तींर्ना जिल्ह्यातील कार्यालयाद्वारे एकुण १ हजार २७ सेवा अधिसुचित करण्यात आलेल्या असुन त्या विहित मुदतीत देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ७२ अधिसुचित सेवांपैकी ५८३ सेवा ऑनलाईन तर ४४४ सेवा ऑफलाईन स्वरुपात जनतेस आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्राद्वारे प्रदान करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेस प्रत्येक वेळी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांची वेळेची बचत होत असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.