शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा – ॲड. निलेश हेलोंडे-पाटील

जंगलापूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट व संवाद ✻ सेलू तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम
वर्धा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी सेलू तालुक्यातील जंगलापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गणेश तुकाराम माहुरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर घेतलेल्या बैठकीत शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.

यावेळी तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे, समाज कल्याणचे विजय कामडी, गट विकास अधिकारी देवानंद पानबुडे, तालुका कृषि अधिकारी श्री. माहुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राम वरठी, महिला व बाल विकासचे व्ही. जी. नागोसे, गट शिक्षणाधिकारी शैलेजा शिंदे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम.डी साखरे, नायब तहसीलदार के.डी. किरसान, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक गौरव गावंडे, मंडळ अधिकारी रमेश भोले, यशवंत लडके, सचिन पिसुड्ढे, ग्राम महसूल अधिकारी श्री. भट, इशा करोदडे उपस्थित होते.

यावेळी ड निलेश हेलोंडे-पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वडील तुकाराम माहुरे यांच्याशी संवाद साधला. त्यांना मिळत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. सदर कुटुंबाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे तालुका प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर तहसील कार्यालयात येथे तालुका विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शासनाच्या सर्व योजना प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचव्यात. तामसवाडा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी बैठकीत दिल्या.

सावकारी कायद्याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. याबाबत तक्रारी असल्यास लेखी स्वरूपात सादर करण्यास प्रोत्साहित करावे. बि-बियाणे, शेती उपयोगी साहित्य वाटपाबाबत तसेच शासकीय जमिनीवर चारा लागवड करण्याच्या सूचना कृषि विभागाला यावेळी त्यांनी दिल्या.

दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दुधाळ जनावरे वाटपाबाबतच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षपणे जाऊन त्यांना दुग्धव्यवसायाबाबत मार्गदर्शन करावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कौशल्य विकास कार्यक्रमातून कार्यकुशल बनविण्यावर भर द्यावा. महिला व बालविकास विभागामार्फत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना बालगोपन या आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या सूचना केल्या.

शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायाच्या प्रशिक्षणाबाबत माहिती देऊन शेती पूरक व्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबतचे काम प्रशासनाकडून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बँक ऑफ इंडिया मार्फत राबविण्यात येणारा कौशल्य विकास कार्यक्रम शेतकरी कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रशिक्षित करण्याचे धोरण राबविण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *