पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यात; ग्रामपंचायतीचा ३७ लाखांचा पाणीपुरवठा घोटाळा ?
पलाश उमाटे/दै.जन-संग्राम वर्धा : सेलू तालुक्यातील मोही ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेली तब्बल ३७ लाखांची पाणीपुरवठा योजना आज पूर्णपणे ठप्प पडली असून, गावकऱ्यांवर कृत्रिम पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली योजना आता जिल्हा परिषदेच्या निष्काळजी कारभार, बेजबाबदार नियोजन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
सध्या उष्णतेचा कहर असताना गावात मुबलक पाणी असताना गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सन २०२१-२२ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलसिंचन मिशन अंतर्गत या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. तब्बल ३७ लाख २२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. उद्घाटनावेळी माठमाठ्या घाषणा, फित कापण आणि फोटोसेशन झाले. मात्र आज गावात दुष्काल सदृश स्थिति निर्माण झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या जागेवर विहीर बांधण्यात आली ती जागा खासगी शेतकऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित शेतकऱ्याने जागेवर ताबा घेताच संपूर्ण योजना बंद पडली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना उभारताना जागेची मालकी तपासली नव्हती का?
लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी झाली होती का? की फक्त निधी खर्च करण्याची घाई होती? या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला असून, जनतेच्या पैशाची उघड लूट झाली, असा आरोप होत आहे. एका चुकीच्या नियोजनामुळे संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना, दुसरीकडे लाखा रुपयाची योजना कागदावरच यशस्वी दाखवून प्रशासन हात झटकत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पाण्यासाठी आलेला निधी अक्षरशः पाण्यात गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया आता मोही गावातून उमटत आहे. आता प्रश्न एकच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई होणार का? की पुन्हा चाकशीच्या नावाखाली फाईल दाबून जनतेची दिशाभूल केली जाणार?








