केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख, स्वागतार्ह निर्णय – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : केंद्र सरकारने सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व दिशादर्शक ठरणारा आहे, असे अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा देणारा असून त्यांच्या खर्चक्षमतेत वाढ होऊन अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.

पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून डाळी व तेलबियांच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. तसेच किसान क्रेडिट कार्डद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खासगी क्षेत्रातील संशोधन संस्थांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद आणि देशभरात ५० हजार अटल टिंकरिंर्ग लॅब्स उभारण्याचा निर्णय हा नवोन्मेष, संशोधन आणि युवकांच्या कौशल्यविकासाला चालना देणारा आहे. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विस्तारासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल. एकूणच, हा अर्थसंकल्प विकसित भारत या संकल्पनेला बळ देणारा असून देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी मजबूत पाया घालणारा आहे. केंद्र सरकारच्या या दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्पाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *