देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्रात आमदारकीसाठी जोरदार रस्सीखेच?

वर्धा/प्रतिनिधी देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्रात प्रभा राव यांच्या रूपात काँग्रेसचा आधीपासूनच वरचष्मा आहे. मध्यंतरी शेतकरी संघटनेच्या सरोज काशीकर यांनी देवळीत एकदा मुसंडी मारली होत परंतु त्यानंतर पुन्हा हा देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्र रणजित कांबळे यांच्या रूपाने काँग्रेसचेच राज्य राहिले आहे. यावेळी प्रभा राव यांच्या कन्या ॲड. चारूलता टोकस यांनी आ. रणजित कांबळे यांच्याऐवजी देवळीची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता लागली असून यावेळी रणजीतदादा की चारुलताताई. परंतु काँग्रेस रणजीतदादांना सोडून चारुलता ताईंना उमेदवारी देईल असे वाटत नाही. तर दुसरीकडे भाजपानेही यावेळी कंबर कसली असून राजेश बकाने नेटाने तयारीला लागले आहेत. वर्धा जिल्ह्यातील देवळीपुलगांव विधानसभा मतदार संघ गेल्या २५ वर्षांपासुन काँग्रेसच्या ताब्यात आहे.

गेल्या २५ वर्षात रणजीतदादा व्यतिरिक्त काँग्रेसकडून कोणताही चेहरा या मतदारसंघात दिसलेला नाही. त्यामुळे यावेळीसुद्धा रणजीतदादा कांबळे यांचा एकछत्री अंमल राहील असेच दिसत आहे. या मतदार संघात भाजपानेही नशीब अजमावले परंतु अपयशच येत गेले. २०१९ मध्ये युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे होता परंतु त्यावेळीही महायुतीला यश मिळवता आले नाही. २०१९ मध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने छातीला माती लावत अपक्ष निवडणूक लढवली आणि शिवसनच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर फेकल. आता पन्हा गेल्या पंचवीशीची वाट तिशीकडे जाण्याची शक्यता सुरू असताना प्रभा राव यांच्या कन्या ॲड. चारूलता टोकस यांनी पहिल्यांदाच विधानसभेसाठी तिकिटाची मागणी केली त्यामुळे काँग्रेसच्या गोटात थोडाफार संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसकडून दादा की ताई अशी चर्चा रंगू लागली आहे.

महायुतीत गेल्या विधानसभेत देवळी-पुलगांव शिवसेनेने लढवल्याने आता शिवसेनेकडूनही दावा केल्याने जोरदार रस्सीखेच निर्माण झालेली आहे. येथे अशोक शिंदे, राजेश सराफ यांनी इच्छा व्यक्त केली असताना गणेश इखार यांनी मतदार संघ पिंजून काढलेला आहे. मात्र, हा मतदार संघ आता भाजपाकडेच राहू देण्याचा आग्रह केल्या जात आहे. त्यामुळे राजेश बकाणे यांनी उमेदवारीची तयारी चालविली असून पुलगावलाही संधी देण्यासाठी संजय गाते यांचेही नाव घेतल्या जात आहे. एकंदरीत गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेसचे या मतदारसंघावर अधिराज्य असून यावेळी महायुतीकडून हा गड काबीज करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. परंतु महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यातच धुसफूस सुरु झाली असून यावेळी काँग्रेसकडून रणजीतदादा कांबळे तर महायुतीकडन काणाचा नंबर उमेदवारीकरीता असेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.