पालकांनो सावधान!… आपला पाल्य काय करतोय? याकडे लक्ष देण्याची आजची गरज

किशोर सुरकार-देवळी : बदलापूरची घटना तसेच महाराष्ट्रात आपल्या सभोवती घडणाऱ्या लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांनी आता पालकांना सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपला पाल्य काय करतो? कुठे जातो? त्यांचा मित्रपरिवार कसा आहे? याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आज निर्माण झालेली आहे. बदलापूर आणि सभोवती घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा जेवढा निषेध करायचा तो कमीच आहे. अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी यामध्ये दुमत नाही. परंतु या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असे जनमत आहे कारण आजकाल आपण बघतो की, अनुचित घटना घडल्यानंतर जनता, सामाजिक संघटना, राजकारणी निषेध व्यक्त करतात, कॅन्डल मार्च निघतो, गुन्हेगाराला शिक्षेची मागणी केली जाते. कालांतराने आपण सहजच सर्व काही विसरुन जातो. परंतु अशा घटना का घडल्या जात आहे, याला

जबाबदार कोण?

गुन्हेगारांना कडक शिक्षा का होत नाही याचा कोणीही विचारच करतांना दिसत नाही. सरकार, प्रशासन सुद्धा अशा घटना घडल्यावरच जागे होतात. वेगवेगळे कायदे करणार? गुन्हेगारांना शिक्षा होणार असे सांगुन मोकळे होतात. पण शेवटी काय होते. आपल्यासारखेच सरकारसुद्धा सगळे विसरुन सोयीस्करपणे बाजुला होऊन जातात. अंमलबजावणी मात्र शुन्य अशीच आजची परिस्थिती बनलेली आहे. अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी पालकांनी जागृत हाण्याची नितात गरज आज निर्माण झालेली आहे. अलिकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून आपण मुलींवर वेळोवेळी बंधने लादतो. त्या कुठे जातात, काय करतात याचा आढावा घेतो. परंतु आपल्या कुळाचा कुलदीपक कुठे दीवा लावतो, याचा साधा पत्तासुद्धा आपल्याला नसतो. एकुणच बेरोजगारीमुळे रोडरोमीयोंची संख्या वाढली असून पालकांनी आता त्याकडे बारकाईन लक्ष देणे गरजचे आहे. याचा प्रत्यय शहर, गावातील रस्ते, उड्डाणपूल, बसस्थानक परिसरात, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात येतो. या भागात असे अनेक रोडरोमीयो खर्रा व गुटक्याच्या पिचकाऱ्या उडवताना निदर्शनास येते. त्यात आपला कुलदीपक आहे का, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे झाले आहे.

दुसऱ्याचे घर जळत असताना ती आग कधी आपल्या घरावर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळीच जागे होऊन आपल्या कुळाचा दीवा कुठे आग लावत आहे, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरुण हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. हे व्यसनाधीन फिल्मी स्टाइलने दुचाकी वाहने चालवून अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. अनेकदा वादाला तोंड फुटते. हेच तरुण शाळकरी मुलींना आपल्या मोहजाळात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. वयात आल्यानंतर त्याला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करून ठेवणे गरजेचे आहे. यामुळे आपला मुलगा कुठे आहे आणि काय करते, यावर आतातरी पालकांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच सरकारने, पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा रोडरोमीयोंविरुद्ध कडक भूमिका घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. अशा मुलांना कुठलीही दयामाया न दाखविता पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमध्ये आहे.